भिवंडीत चार लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या बोगस पत्रकारासह दोघा महिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 22:54 IST2021-08-12T22:53:54+5:302021-08-12T22:54:16+5:30
Extortion Case : या तिघांना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे .

भिवंडीत चार लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या बोगस पत्रकारासह दोघा महिलांना अटक
नितिन पंडीत
भिवंडी -पत्रकार व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्या पुरुष साथीदारास भिवंडी तालुका पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. युट्युब चॅनलच्या पत्रकार विनिता किरण लांडगे, ह्युमन राईट संस्थेच्या स्वयंघोषित पदाधिकारी निशा प्रदीप कुरापे दोघी रा.नवी मुंबई व भीम आर्मी चा पदाधिकारी म्हणून वावरणारा अविनाश गरुड रा.चेंबूर अशी खंडणी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवंडी शहरातील धान्य व्यापारी रकीब मतलुब खान यांचे धान्याचे गोदाम सुरू ठेवण्यासाठी या त्रिकूटने १५ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी तडजोड करून ४ लाख रुपये खंडणी १ ऑगस्ट रोजी सोनाळे येथे मुंबई नाशिक महामार्गावर स्वीकारली होती . या दरम्यान या त्रिकूटवर ७ ऑगष्ट रोजी मुंबई एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती . या नंतर १० ऑगष्ट रोजी फिर्यादी रकीब मतलुब खान यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या त्रिकुटा विरोधात तक्रार दिल्याने मुंबई येथील गुन्ह्यात जामिनावर या तिघांनी सुटका होताच या तिघांना भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे . या तिघां विरोधात विविध कालमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही गुरुवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघांना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे .