धूमस्टाईल बाईक रायडर ठरला देवदूत! तरुणानं दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 21:09 IST2021-02-24T21:05:05+5:302021-02-24T21:09:18+5:30
सराफा दुकानातून बाहेर पडणाऱ्या महिलेच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून दुचाकी वरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना धूम चित्रपटातील स्टाईल नुसार पाठलाग करून एका तरुणाने पकडून दिले.

धूमस्टाईल बाईक रायडर ठरला देवदूत! तरुणानं दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या
मीरारोड - सराफा दुकानातून बाहेर पडणाऱ्या महिलेच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून दुचाकी वरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना धूम चित्रपटातील स्टाईलनुसार पाठलाग करून एका तरुणाने पकडून दिले.
मीरारोड येथील शीतल नगर भागातील एका सराफा दुकानारून एका महिलेने सुमारे अडीच लाख किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. ती महिला दुकानाच्या बाहेर आली असता आधीच पाळत ठेऊन असलेल्या दोन दुचाकीस्वारांनी वेगाने येऊन महिलेच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसकावून पळ काढला .
महिलेने चोर - चोर अशी ओरड सुरु केली असता समोरच्या दिशेने दुचाकी वरून जाणाऱ्या गणेश लोहकरे या तरुणाने दुचाकी वळवून चोरट्यांचा पाठलाग सुरु केला . लोहकरे याने आधी जागींड सर्कल व तेथून शांती पार्क, सिल्व्हर पार्क वरून हाटकेश असा चोरट्यांचा पाठलाग केला . चोरटयांनी देखील त्यांच्या कंदील जॅकेट व दागिन्यांची पिशवीने लोहकरे यास मारहाण करत खाली पाडले . परंतु खाली पडून पायाला लागले असून देखील लोहकरे याने त्यांचा पाठलाग सोडला नाही .
अखेर हाटकेश सिग्नल जवळ लोहकरे यांनी त्यांची दुचाकी चोरट्यांच्या दुचाकी समोर आडवी टाकल्याने दोघे चोरटे खाली पडले . ते खाली पडल्या नंतर दोघांनाही लोहकरे याने पकडले . त्यावेळी चोरट्यांच्या मागावर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक पाटील सुद्धा तेथे पोहचले . आरोपीना पकडून दुचाकी जप्त केली असून मुद्देमाल सुद्धा पोलिसांना सापडला आहे . काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चोरट्याना अटक केली आहे .