लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
By राजकुमार जोंधळे | Updated: April 28, 2025 23:30 IST2025-04-28T23:28:09+5:302025-04-28T23:30:31+5:30
मागील भांडणाच्या कारणावरुन केली जबर मारहाण

लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
राजकुमार जाेंधळे, अहमदपूर (जि. लातूर): तालुक्यातील हाडाेळतीत मागील भांडणाच्या कारणावरुन २१ वर्षीय युवकाला काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली हाेती. जखमी युवकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात रविवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दाेघांनाही अटक केली असून, साेमवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगळवारपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, हाडोळती येथील फिर्यादी छाया दत्तात्र्यय सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून, पती हेअर सलूनमध्ये काम करतात. तर मोठा मुलगा पुणे येथे केटरींगचे काम करतो. लहान मुलगा बळीराम दत्तात्र्यय सूर्यवंशी (वय २१) हा गावातच माेलमजुरीचे काम करतो. मुलीचा विवाह झाला आहे. शनिवार, २६ एप्रिलरोजी सकाळी छाया सूर्यवंशी या उमरगा येथे कापूस वेचण्यासाठी गेल्या हाेत्या. तर पती दत्तात्र्यय लक्ष्मण सूर्यवंशी हे लातुर येथे औषधी आणण्यासाठी गेले हाेते. मुलगा बळीराम सूर्यवंशी हा दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त गौस समद शेख याच्या घरी गेला हाेता. दरम्यान, मागील भांडणाच्या कारणावरून बळीराम सूर्यवंशी याला गौस समद शेख आणि गफूर गौस शेख (दाेघेही रा. हाडोळती ता. अहमदपूर) यांनी काठीने जबर मारहाण केली. यामध्ये बळीराम हा गंभीर जखमी झाला. बेशुद्धावस्थेत पडलेल्या बळीरामला त्याच्या घरासमोर फेकून दिले. जखमी बळीरामला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती स्वत: गौस समद शेख यांने फोनवरुन बळीराम याच्या वडिलाला सांगितली.
याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात छाया सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गौस समद शेख, गफूर गौस शेख यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला आहे. या दाेघांनाही पाेलिसांनी अटक केली. त्यांना साेमवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगळवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.