लातुरात राडा करणाऱ्यांना दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:11 IST2022-07-20T19:10:39+5:302022-07-20T19:11:29+5:30
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या.

लातुरात राडा करणाऱ्यांना दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
राजकुमार जाेंधळे -
लातूर - येथील दादोजी कोंडदेव नगर, रिंगरोड, लक्ष्मी कॉलनी, राधाकृष्ण नगर, सद्गुरुनगर, कालिकादेवी मंदिर, जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेऊन वाहनांची ताेडाफाेड करत, दशहत निर्माण करणाऱ्या तिघांविराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या दाेघांना लातूरच्या न्यायालयात दुपारी हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या. एवढेच नाही, तर त्यांनी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या काचाही फाेडल्या. हातात काेयता घेत काही जणांना धमकावत पैशाची मागणीही करण्यात येत हाेती. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात पाेलिसांना माहिती दिली. पाेलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल हाेत, तिघांपैकी दाेघांच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, एका वाहनचालकाच्या उजव्या पायावर काेयत्याने वार केल्याने तो जखमी झाला. शिवाय, अन्य दाेघांनाही मारहाण करण्यात आली आहे. याबाबत स्वप्निल इंडे (रा. सास्तूर ता. लाेहारा जि. उस्मानाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात अजिंक्य निळकंठ मुळे (वय २६, रा. दादाेजी काेंडदेव नगर, लातूर), संकेत ऊर्फ हन्या तावरे (वय २०, रा. लक्ष्मी काॅलनी, लातूर) आणि अन्य एकाविरुद्ध कलम ३०७, ३९४, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, असे तपास सहायक पाेलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी सांगितले.