अंबरनाथमध्ये व्यावसायिकाच्या घरावर दोघांचा गोळीबार; दुचाकीवरून हल्लेखोर पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:20 IST2025-04-22T06:19:46+5:302025-04-22T06:20:23+5:30

पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडून पळ काढला. ही घटना पनवेलकर यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 

Two men opened fire at a businessman vishwanath Panvelkar house in Ambernath; The attackers fled on a bike | अंबरनाथमध्ये व्यावसायिकाच्या घरावर दोघांचा गोळीबार; दुचाकीवरून हल्लेखोर पसार 

अंबरनाथमध्ये व्यावसायिकाच्या घरावर दोघांचा गोळीबार; दुचाकीवरून हल्लेखोर पसार 

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबाराची घटना सोमवारी दुपारी घडली. दुचाकीवरून दोन अनोळखी हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. जितेंद्र पवार असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती.

अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक पनवेलकर यांचे ‘सीताई सदन’ नावाने घर आहे. सोमवारी अडीचच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन  हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडून पळ काढला. ही घटना पनवेलकर यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 

हल्लेखोर नामचीन गुंड
आरोपी जितेंद्र पवारवर २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. जेलमध्ये नेताना त्याने पत्रकारांवर दगड भिरकावला होता. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ले प्रकरणातही त्याचे नाव आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.  

पनवेलकर होते कोर्टात 
विश्वनाथ पनवेलकर हे सोमवारी सकाळीच मुंबई उच्च न्यायालयात कामानिमित्त गेले होते. न्यायालयात असतानाच त्यांना आपल्या घरावर हल्लेखोरांनी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे  गोळीबार करणारा व्यक्ती आणि त्यामागचा सूत्रधार यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली.

आरोप-प्रत्यारोप
आमचे दगड खदानीच्या प्रकरणात वाद सुरू आहेत. त्याच वादातून हा गोळीबार करण्यात आला असून त्यात बदलापूरच्या आमदारांचा हात असल्याचा मला संशय आहे. या आधीही आम्हाला अशा प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. - विश्वनाथ पनवेलकर, उद्योजक

चोराच्या मनात चांदणे. त्यांनीच त्यांच्यावर हा गोळीबार घडवून आणल्याचा संशय आहे. असे प्रकार करण्याची मला कधी गरज पडलेली नाही. या प्रकरणाची चौकशी होईलच आणि सत्य बाहेर येईल. - किसन कथोरे, आमदार

Web Title: Two men opened fire at a businessman vishwanath Panvelkar house in Ambernath; The attackers fled on a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.