कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:35 IST2025-09-27T19:27:46+5:302025-09-27T19:35:19+5:30
अहमदाबादमध्ये ऑनलाईन जेवण मागवणाऱ्या दोन मुलींना त्यांच्या आईने बेदम मारहाण केली.

कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
Ahmedabad Crime: आजकाल ऑनलाइन जेवण मागवणं हे खूपच सामान्य झाले आहे. जेव्हा जेव्हा घरी बनवलेल्या जेवणाचा कंटाळा येतो तेव्हा लोक त्यांचा मूड बदलण्यासाठी ऑनलाइन जेवण ऑर्डर करतात. मात्र गुजरातमध्ये दोन बहिणींना हे चांगलेच महागात पडले. मुलींच्या आईला बाहेरून जेवण ऑर्डर केल्याचे कळताच तिने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मुलींनी अभयम महिला हेल्पलाइनवर फोन करून मदत मागितली.
गुजरातमधील अहमदाबादमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका आईने तिच्या दोन मुलींना ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्याबद्दल बेदम मारहाण केली. परिस्थिती इतकी बिकट झाली की मुलींना अभयम महिला हेल्पलाइनवर कॉल करावा लागला, त्यानंतर त्यांना त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी पाठवण्यात आले. दोन्ही मुलींना घरी बनवलेल्या जेवणाचा कंटाळा आला होता आणि म्हणून त्यांनी बाहेरून जेवण मागवले. मात्र आईला याचाच राग आला आणि तिने दोघींना मारहाण केली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बुधवारी दोन मुलींनी अभयम महिला हेल्पलाइनकडे तक्रार दाखल केली आणि त्यांच्या आईने त्यांना मारहाण केल्याचा दावा केला. घटनास्थळी एक टीम पोहोचली तेव्हा मुलींनी सांगितले की त्यांच्या पालकांचा पाच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. त्यांचा भाऊ आता त्यांच्या वडिलांसोबत राहतो आणि त्या आईसोबत राहतात.
मुलींनी सांगितले की त्यांची आई बराच काळ बाहेर राहते आणि दारू पिते, जे त्यांच्या वडिलांपासून वेगळे होण्याचे एक कारण होते. मुलींनी सांगितले की त्यांची आई बाहेर असताना ते स्वतःच जेवण बनवत असत. बुधवारी, त्यांची आई बाहेर असताना, मुलींनी बाहेरून जेवण मागवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची आई परत आली तेव्हा तिने दोन्ही मुलींना शिव्या दिल्या आणि मारहाण केली. आई दारू प्यायली होती, म्हणून मुलींनी मदतीसाठी हेल्पलाइनवर फोन केला.
जेव्हा अभयमची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा ती महिला नीट बोलूही शकत नव्हती. तिने मुलींवर आरोप केला की त्या मला माझ्या मनाप्रमाणे जीवनाचा आनंद घेऊ देत नाही. नंतर टीमने मुलींना तिच्या आजी-आजोबांच्या घरी पाठवले. समुपदेशकांनी मुलींच्या आजी-आजोबांशी बोलणं केल्यानंतर त्यांनी त्यांची काळजी घेण्यास सहमती दर्शवली. मुलींचे शिक्षण आणि करिअर सुनिश्चित करण्यासाठी महिलेचे समुपदेशन करण्यात आले आणि तिला तिच्या वर्तनात सुधारणा करण्यास सांगितले.