मीरा रोडमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दोन कोटींचा दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:51 IST2021-01-08T05:50:23+5:302021-01-08T05:51:02+5:30
चारही दरोडेखोरांचे पलायन : घटनेमुळे शहरात उडाली खळबळ

मीरा रोडमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दोन कोटींचा दरोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमधील एस. कुमार या ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी चौघा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घातला. सुमारे दोन कोटींचे दागिने लुटून त्यांनी पोबारा केला.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुकानातील काही कर्मचारी जेवायला बसले होते, तर काही कर्मचारी काउंटरजवळ उभे होते. त्या वेळी दोन दुचाकींवरून आलेले चौघे दरोडेखोर हे ग्राहक म्हणून दुकानात आले. चौघांनी दागिने खरेदी करायचे म्हणून कर्मचाऱ्यांना दागिने दाखवायला सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यांना दागिने काढून दाखवले.
खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे मागितले असता चौघांपैकी दोघांनी अग्निशस्त्रे काढली. पिस्तुलाचा धाक दाखवून चौघांनी शोकेसमधील दागिने बॅगेत भरले व बाहेर आले. दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नयानगर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकीच्या क्रमांकावरून दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरची दरोड्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.
या दरोड्यात हिरे, पांढरे सोने व सोन्याचे सुमारे दोन कोटींचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दुकानदार आणखी किती दागिने दरोडेखोरांनी लुटले याची पडताळणी करून त्याची माहिती पोलिसांना देणार आहे.
चेहरे ओळखणे अवघड
n दरोडेखोर हे मास्क घालून आलेले होते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळून देखील त्यांचे चेहरे ओळखणे अवघड जात आहे.
n दरोडेखोर सहजपणे वावरत असल्याने त्यांनी दुकानाची माहिती काढल्याची शक्यता आहे. दोन दरोडेखोरांनी दुचाकी सुरू न झाल्याने ती तशीच टाकून गेले होते. पोलिसांनी त्या दुचाकीची माहिती घेतली असता ती नालासोपारा येथील असल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे.