मंगेश कराळे
नालासोपारा - डॉग स्कॉड आणि मयताच्या हातावरील टॅटूमुळे मयताची ओळख पटवून दोन आरोपींना अटक करण्यात आली. मुंडके नसलेल्या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पेल्हार पोलिसांना १२ तासांत यश मिळाले आहे. हत्या करून फेकलेले मुंडके व मोबाईल खानिवडे खाडीतून पोलिसांनी हस्तगत केले आहे. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेपाडा येथील पाटील कुटुंबीयांच्या आंब्याच्या वाडीत काही तरुणांना झुडपांमध्ये एक संशयास्पद गोणी आढळून आली होती. या गोणीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तत्काळ पेल्हार पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोणी उघडून पाहिली असता, त्यात एका पुरुषाचे मुंडके नसलेले धड आढळून आले होते. मृतदेहाचे मुंडके नसल्याने मृताची ओळख पटवणे हे पेल्हार पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. मृताच्या उजव्या हातावर 'अशोक सिंह' असे नाव आणि बदामाचे चिन्ह गोंदलेले होते. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पेल्हार पोलिसांनी दिले होते.
पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अंमलदार यांनी तब्बल १२ तास काहीही न खातापीता अथक प्रयत्न करुन १०० ते १५० सीसीटीव्ही तपासून संशयित वाहनांचा शोध घेतला. तसेच ठाण्यावरून आलेले डॉग स्कॉड जाबरपाडा दिशेने गेले आणि पोलिसांना तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी माहिती प्राप्त करुन तपासाचे आधारे संशयीत दिनेशकुमार कानाराम प्रजापती (२७) याला पेल्हार गाव जाबरपाडा परिसरातून शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करून त्याचा मित्र संदिप ब्रम्हदेव तिवारी (२५) याला ताब्यात घेतले. या दोघांनी मिळून त्यांचा मित्र मयत अशोक सिंग करम सिंग राजपुत (३२) याला जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. आरोपी दिनेशकुमार आणि मयत अशोक सिंग यांच्यामध्ये भागीदारीत किराणा माल विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसायातील आर्थिक वादातून आरोपींनी अशोक सिंहला धारदार हत्याराने त्याचे शीर कापून त्याचे शरीरावर अनेक वार करुन जीवे ठार मारले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मागदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि रमेश वाघचौरे, पोउपनि तुकाराम भोपळे, सफौ योगेश देशमुख, पोहवा तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, अभिजीत नेवारे, नामदेव ढोणे, अशोक परजने, वसिम शेख, अनिल वाघमारे, अमोल मस्से, निखील घोरपडे, सोहेल शेख यांनी केली आहे.
Web Summary : Nalasopara: A man was beheaded due to a financial dispute. Police solved the murder within 12 hours by identifying a tattoo. Two accused are arrested; head recovered from creek.
Web Summary : नालासोपारा: आर्थिक विवाद के कारण एक व्यक्ति का सिर काटा गया। पुलिस ने टैटू से पहचान कर 12 घंटे में हत्या का खुलासा किया। दो आरोपी गिरफ्तार, खाड़ी से सिर बरामद।