२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 06:07 IST2025-11-02T06:06:54+5:302025-11-02T06:07:35+5:30
संशयित सागर राजेश मिश्रा (२२) आणि सागर सुनिल वर्मा (१९) यांना अटक करण्यात आली आहे

२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): तब्बल २४ मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि यांनी शनिवारी दिली.
२३ ऑक्टोबरला रश्मी कॉम्पलेक्स मध्ये राहणारा अमित तिवारी (२५) हा तरुण आचोळे रोडवरुन आठवडे बाजारासाठी जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्याच्या हातातील मोबाईल खेचला. पण अमितने विरोध केल्यावर एका आरोपीने लोखंडी फायटर हत्याराने त्याच्या पोटामध्ये मारुन दुखापत केली. त्यानंतर त्याच्या हातातील ओपो कंपनीचा मोबाईल जबरजस्तीने खेचून जबरी चोरी करुन पळून गेले. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या.
आचोळ्याच्या गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा नंबर मिळवला. त्याआधारे आरोपीचा पोलीस शोध घेत असताना आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून वेळोवेळी जागा बदलुन फिरत होते. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा शोध घेतला ती दुचाकी व त्यावर दोघे नालासोपारा परिसरात फिरत असल्याचे दिसुन आले. त्यावेळी त्यांना डी मार्ट जवळ दुचकीसह ताब्यात घेतले. संशयित सागर राजेश मिश्रा (२२) आणि सागर सुनिल वर्मा (१९) यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोन्ही आरोपीकडे चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केल्यावर आचोळे पोलीस ठाणे हद्दीतुन एकुण २४ मोबाईल खेचुन जबरी चोरी केली असल्याचे पोलीसांना सांगितले. आरोपीकडे गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला असून यापुर्वीही चोरी केलेले वेगवेगळ्या कंपनीचे २४ मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली १ दुचाकी असा एकुण ३ लाख २३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.