अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:15 IST2019-06-13T19:14:49+5:302019-06-13T19:15:26+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पेपरफूटप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे.

अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पेपरफूटप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे. अटकेतील आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पेपरफूट प्रकरणाचे दूरवर पसरलेले धागेदोरे उकलण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.
आशिष श्रीराम राऊत (२८, रा. बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला), निखिल अशोक फाटे (२७, रा. पलास गल्ली, गाडगेनगर, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातील लिपिक ज्ञानेश्वर प्रभू बोरे हा अद्यापही पसार असल्याचे प्राचार्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी पेपरफूट प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष राऊत यास बोर्डी रस्त्यावरून मोठ्या शिताफीने १२ जून रोजी उशिरा रात्री अटक करण्यात आली. त्याच्या बयाणावरून अमरावतीच्या गाडगेनगर स्थित फाटे कोचिंग क्लासेसचा संचालक निखिल फाटे यास त्याच्या निवासस्थावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयापुढे सादर केले. पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
आशिष राऊत हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोलकाता येथील लर्निंग स्पायरल या कंपनीकडे अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. लर्निंग स्पायरल कंपनीकडे विद्यापीठातून अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आॅनलाइन पेपर पाठविण्याची जबाबदारी होती. २९ मे रोजी आशिष राऊत याने वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातील ज्ञानेश्वर बोरे याच्या मोबाइलवर ४५ मिनिटे अगोदर पेपर पाठविला. बोरे याने तो पेपर डाऊनलोड करून व्हायरल केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. बोरे अज्ञात पोलिसांना गवसला नाही. या प्रकरणातील आरोपींची संख्या १५ ते २० राहील, असे तपास अधिकारी राजेंद्र लेवटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एमपीएससी परीक्षेचे ‘अमरावती कनेक्शन’
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी फाटे कोचिंग क्लासेस अवघ्या काही वर्षांत अमरावती शहरात नावारूपास आले आहे. येथून अभियांत्रिकीसह एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या डोळे दीपवून टाकणारी आहे. त्यामुळे फाटे कोचिंग क्लासेसचे एमपीएससी परीक्षेशी ‘कनेक्शन’ जुळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्या दृष्टीनेही उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर तपास करीत आहे.