घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:42 IST2025-08-07T14:41:54+5:302025-08-07T14:42:15+5:30
कर्जबाजारीपणामुळे एका व्यक्तीने तीन मुलींची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना तमिळनाडूतून समोर आली आहे.

घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल
Tamil Nadu Crime: तमिळनाडूमध्ये हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणामुळे एका बापाने पोटच्या तीन मुलींच निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवलं. पत्नी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत बंद असल्याने दोघेही बचावले आहेत. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्यांनी घराकडे धाव घेतली आणि सगळा प्रकार समोर आला. चौघांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील वेप्पागौंडनपुथुर गावात एका ३६ वर्षीय व्यक्तीन तीन अल्पवयीन मुलींचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. याआधी त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला वेगळ्या खोलीत बंद केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही भयानक घटना घडली. एम. गोविंदराज असे या आरोपीने प्रथम आपल्या मुली प्रतीक्षाश्री (१०), ऋतिकाश्री (७) आणि देवश्री (६) यांची निर्घृण हत्या केली आणि नंतर चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली.
हा सगळा प्रकार घडला त्यावेळी गोविंदराजची पत्नी भारती (२६) आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा अग्निस्वरन दुसऱ्या खोलीत होते. खोली बाहेरून बंद होती आणि ते बाहेर येऊ शकत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ते घटनास्थळी धावले. त्यांनी भारतीला बंद खोलीतून बाहेर काढले. जेव्हा ती पतीच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला तिन्ही मुली मृतावस्थेत पडलेल्या होत्या. गोविंदराजचाही गळा चिरलेला होता.
पोलिसांच्या तपासात गोविंदराज एका खाजगी कंपनीत बोअरवेल मॅनेजर म्हणून काम करत होता. गोविंदराजने बोअरवेल फर्म सुरू करण्यासाठी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच त्याच्यावर १३.५ लाखांचेही कर्ज आहे. हे पैसे घर बांधण्यासाठी घेतले होते. त्याने त्याच्या आई आणि बहिणीच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था आणि महिला बचत गटांकडून पैसेही घेतले होते, जे तो परत करू शकत नव्हता. कर्ज फेडता येत नसल्याने तो तणावाखाली होता. याच मानसिक दबावामुळे त्याने हे भयानक पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक संकट आणि कर्ज फेडण्यात अपयश आल्यामुळे त्याने हे आत्मघातकी पाऊल उचलले असे दिसते, असं नामक्कल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.