शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:07 IST2025-12-10T09:07:26+5:302025-12-10T09:07:52+5:30
जिल्हा प्रशासनाने या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. मृत महिलेचे शीर शोधण्यासाठी ODRAF टीम शोध मोहिम राबवत आहे.

शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार
मलकानगिरी - ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात MV 26 गाव अवघ्या एका दिवसांत उद्ध्वस्त झालं. याठिकाणी आदिवासी महिलेचा शीर कापलेला मृतदेह सापडला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आक्रोश पसरला आणि त्यांनी शरणार्थी बांगलादेशींची १६० घरांना आग लावली. या भयंकर हिंसाचारामुळे गावात भयाण शांतता पसरली आहे. या घटनेची सुरुवात राखलगुडा येथील गावात ५१ वर्षीय आदिवासी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर झाली. या महिलेचं शीर अन् धड वेगळे केले होते. ही हत्या मलकानगिरी गाव २६ मधील काही लोकांनी केली असा आरोप आदिवासी समुदायाने केला. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी मंगळवारी सकाळी या गावावर हल्ला केला आणि घरांना आग लावली. सुरक्षा जवान येईपर्यंत अख्खं गाव रिकामे झाले होते. गावात एकही रहिवासी आढळला नाही. भयभीत झालेल्या लोकांनी सुरक्षित ठिकाण गाठले.
५० वर्षांपासून राहतायेत शरणार्थी कुटुंब
मलकानगिरी गाव २६ मध्ये राहणारे हिंदू शरणार्थी जवळपास ५० वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आले होते. हा समुदाय शांततेत राहत होता परंतु एका घटनेने गेल्या कित्येक वर्षाच्या शांततेचा भंग झाला. याठिकाणी शरणार्थी समुदायाचे अध्यक्ष गौरांग कर्मकार यांनी म्हटलं की, भारत आमच्यासाठी सुरक्षित घर असेल असा आम्ही विचार केला होता. परंतु या घटनेनं आम्हाला कटु आठवणी दिल्या. ज्या आदिवासी महिलेची हत्या झाली त्याचा आम्ही निषेध करतो. जे कुणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु त्याचा राग ठेवून आमचं संपूर्ण गाव जाळणं हे अन्यायकारक आणि वेदनादायी आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. मृत महिलेचे शीर शोधण्यासाठी ODRAF टीम शोध मोहिम राबवत आहे. पाण्याखालील कॅमेराचा वापर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही समुदायांच्या शिष्टमंडळाची शांतता बैठक घेण्यात आली. लवकरात लवकर परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी असा पोलिसांचा प्रयत्न आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असून दोन्ही समुदायाला शांत राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.