कत्तलीसाठी चक्क ट्रॅव्हल्समधून गोवंशाची वाहतूक; बीडीएस पथकाची मोठी कारवाई
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 20, 2022 19:55 IST2022-08-20T19:54:20+5:302022-08-20T19:55:45+5:30
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या वर्ध्यातील बीडीएस पथकाने पाहणी करून गोवंशांची सुटका केली.

कत्तलीसाठी चक्क ट्रॅव्हल्समधून गोवंशाची वाहतूक; बीडीएस पथकाची मोठी कारवाई
चैतन्य जोशी -
तळेगाव : सारवाडी नजीकच्या पारडी फाट्याजवळ रस्त्याकडेला बंद स्थितीत उभ्या असलेल्या मिनी ट्रॅव्हल्समधून चक्क कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या वर्ध्यातील बीडीएस पथकाने पाहणी करून गोवंशांची सुटका केली. आरोपी मात्र पसार झाले होते. ही कारवाई २० तारखेला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वर्ध्यातील बॉम्ब शोधक पथक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर होते. पथक कारंजाकडून तळेगावकडे येत असताना सारवाडी नजीकच्या पारडी फाट्याजवळ रस्त्याकडेला एम.एच. ०६ एफ.के. ०९२१ उभी होती. पथकातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी मिनी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता, त्यात गोवंश कोंबून असल्याचे दिसून आले. यात १२ गोवंश जिवंत तर दोन गाई मृत आढळून आल्या. याची माहिती त्यांनी तत्काळ तळेगाव ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ट्रॅव्हल्स ताब्यात घेत गोवंशांना टाकरखेड येथील गोशाळेत पाठविले.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, परवेज खान, मनोज असोले, सुधीर डांगे, अमोल मानमोडे, विजय उईके करीत आहे.