Indore: एकाच वेळी २२ तृतीयपंथीयांचा जीव देण्याचा प्रयत्न; बंद खोलीत सुरु होता प्रकार, इंदूरमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:29 IST2025-10-16T15:09:06+5:302025-10-16T15:29:05+5:30
Indore Crime News: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एकाच वेळी तृतीयपंथीयांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

Indore: एकाच वेळी २२ तृतीयपंथीयांचा जीव देण्याचा प्रयत्न; बंद खोलीत सुरु होता प्रकार, इंदूरमध्ये खळबळ
MP Crime: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. इंदूर शहरातील नंदलालपुरा भागात बुधवारी संध्याकाळी २२ तृतीयपंथीयांनी एकाच वेळी फिनाईल पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर चार जणांनी एमवाय हॉस्पिटलबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि बाटल्या जप्त केल्या. सध्या, फिनाईल प्यायलेल्या सर्व तृतीयपंथीयांना एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. मात्र सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण समोर आलेले नाही.
इंदूरच्या नंदलालपुरा परिसरातील एका घरात सुमारे २२ तृतीयपंथीयांना बंद खोलीत फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरलही केला. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दरवाजा उघडला आणि सर्वांना तात्काळ उपचारासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तृतीयपंथींमध्ये झालेल्या वादानंतर एका गटाने सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
नंदलालपुरात दोन तृतीयपंथी गटांमध्ये बऱ्याच काळापासून भांडण सुरू आहे. एका गटाचे नेतृत्व सपना गुरु आणि दुसऱ्या सीमा आणि पायल गुरु करत आहेत. दोन्ही गटांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी इंदूरला येथे आल्या होत्या आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वादाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक आधीच स्थापन करण्यात आली, पण तीन महिने उलटूनही टीम कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी एका तृतीयपंथीने दोन पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार तृतीयपंथीयाने सांगितले की, तिच्या आश्रमातील गुरूविरुद्ध २४ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, १२ जून रोजी, आरोपी पंकज जैन हा त्याचा साथीदार अक्षयसह तिच्या आश्रमात आला. त्या दोघांनी तिला धमकावले आणि नंतर पंकजने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला बदनामीची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर तिने तिच्या गुरुला घडलेला प्रकार सांगितला आणि मंगळवारी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार, हल्ला आणि धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.