वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्याला जाब विचारल्याने भररस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:50 IST2018-09-19T14:49:41+5:302018-09-19T14:50:21+5:30

वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्याला जाब विचारल्याने भररस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण
उल्हासनगर - वाहतूक नियमाचे भंग केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसाला, संतप्त तरुणाने भर रस्त्यात चोप दिला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -4, ओ टी सेक्शन परिसरात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भरधाव जाणाऱ्या मोटारसायकला थांबविण्याचा पर्यंत वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर यांच्यासह सोबत असलेल्या वॉर्डनने केला. तेव्हां भरधाव मोटारसायकल त्यांच्या हाताला लागल्याने, त्यांच्या हातातील बिलबुक व डोक्यावरील टोपी खाली पडली. बिलबुक व टोपी घेण्यासाठी खाली वाकलेल्या पोलीस वाहतूक पोलिसाला मोटरसायकलस्वार अप्पा मुंडे यांनी मोटारसायकल अडविल्याच्या रागाच्या भरात रावसाहेब काटकर यांना मारहाण करू लागला. या प्रकाराने खळबळ उडाली असून अप्पा मुंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण करण्याचे चित्रण मोबाइलफोनमध्ये चित्रित होत असल्याचे अप्पा मुंडे यांच्या लक्षात आल्यावर, त्याने मारहाण करणे बंद करुन पोलिसांच्या शर्टाची कॉलर पकडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अप्पा मुंडे याला अटक करून पोलिसाला मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे आदी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.