एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:42 IST2025-10-30T10:41:38+5:302025-10-30T10:42:15+5:30
आधी पूर्णिमा १५ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. पत्नीला शोधण्यासाठी तिच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
आंध्र प्रदेशातील इलुरु जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका जोडप्याने सेल्फी काढून आणि एक व्हिडीओ बनवून आपले आयुष्य संपवले. इतकंच नाही तर, या व्हिडीओमध्ये त्यांनी एका तरुणाला आपल्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे. या व्हिडीओमध्येच त्यांनी आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे देखील म्हटले होते. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहे. आता मृतांच्या कुटुंबियांनी आरोपी तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इलुरु जिल्ह्यातील भीमाडोल गावात राहणाऱ्या गुंडूमोलू सुधाकर आणि त्याची पत्नी भानूपुर्णिमा यांनी विष पिऊन आत्महत्या केली. ५ वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये सगळं काही छान सुरू होते. दोघे पती-पत्नी एकाच सीमेंट फॅक्टरीमध्ये काम करत होते. याच दरम्यान सुधाकरची पत्नी पूर्णिमा हिची ओळख त्याच गावात राहणाऱ्या कटारी मोहनशी झाली. हळूहळू त्यांची ही मैत्री प्रेमात बदलू लागली. सुधाकरला देखील पत्नीवर संशय येऊ लागला होता. त्याने याबाबतीत विचारणा केली असता, दोघांमध्ये वाद सुरू झाले.
व्हिडीओ केला अन् म्हणाले..
दरम्यान, पूर्णिमा १५ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली. पत्नीला शोधण्यासाठी तिच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासादरम्यान पूर्णिमा मोहनसोबत गेल्याचे उघड झाले. मात्र, काही दिवसांनी पूर्णिमा तिच्या पतीकडे परतली. पूर्णिमा मोहनकडे गेल्यापासून तिचा पती सुधाकर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. पत्नी परत आल्यावर या जोडप्याने एक व्हिडीओ बनवला आणि तो मित्र आणि नातेवाईकांना पाठवला. या सोबतच त्यांनी एक सुसाईड नोट देखील सोडली. मृत्यूच्या आधी त्यांनी एक सेल्फी देखील काढला होता.
विष प्राशन करून संपवलं आयुष्य
या शेवटच्या व्हिडीओमध्ये, त्यांनी म्हटले की, यांना आता जगायचे नाही आणि नंतर दोघांनीही विष प्राशन केले. पूर्णिमा व्हिडीओमध्ये म्हणाली की, कटारी मोहन तिच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. तिने आरोप केला की, त्याने तिला आमिष दाखवून पळवून नेले होते. विष प्राशन केल्यानंतर, बेशुद्ध झालेल्या जोडप्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान पूर्णिमाचा मृत्यू झाला, तर सुधाकरचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
या घटनेमुळे त्यांचा तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. पूर्णिमाच्या जबाबावरून पोलिसांनी मोहनला अटक केली. भीमाडोलू पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.