अलीगढ - उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथे एका युवकाने फेसबुक लाईव्ह करून विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मृत व्यक्तीचे नाव संजय सिंह असं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय सिंह जलालपूर गावात राहणारा होता. त्याने पत्नी अनिता आणि सासरच्यांवर छळ केल्याचा आरोप करत किटकनाशक औषध घेतले. १४ वर्षापूर्वी संजयचं अनितासोबत लग्न झाले होते. त्यांना ४ मुली होत्या. ६ ऑगस्टला गावातील एका युवकासोबत पत्नी अनिता पळून गेली होती असं संजयने व्हिडिओत म्हटलं आहे.
पत्नी गावातील युवकासोबत पळाल्यानंतर घरच्यांनी तिचा शोध घेतला. तिला पुन्हा घरी आणले. प्रियकराला मारहाण करत पत्नी अनिताला तिच्या माहेरी सोडले. त्यानंतर अनिता आणि तिच्या घरच्यांनी संजयवर पत्नीसोबत राहण्यास दबाव आणला. संजयने व्हिडिओत म्हटलंय की, अनिता तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरू लागली. ज्याच्यासोबत ती पळून गेली होती. या मानसिक दडपणाखाली आणि छळाला कंटाळून संजयने गावातील एका चौकात असलेल्या दुकानातून किटकनाशक औषध घेतले आणि तिथेच पिले. यावेळी त्याने फेसबुक लाईव्ह सुरूच ठेवले होते.
संजयची अवस्था चिंताजनक
किटकनाशक औषध प्यायल्यानंतर संजयने त्याच्या भावाला फोन करून माहिती दिली. भाऊ जितेशने तात्काळ ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या संजयला सामुहिक आरोग्य केंद्रात नेले. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. डॉक्टरांनी त्याला जेएन मेडिकल हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. सध्या संजयवर उपचार सुरू आहेत परंतु अजूनही तब्येत गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांनी संजयच्या फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ जप्त केला आहे. ज्यात त्याने त्याला होणारा त्रास आणि आत्मघातकी निर्णय घेण्याला जबाबदार असणाऱ्यांची नावे घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
मुख्यमंत्री योगींकडे मागितली मदत
संजयने त्याच्या फेसबुक लाईव्हमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती. माझ्या कुटुंबाला आणि पत्नीच्या कुटुंबाला त्रास दिला जाऊ नये. त्यात त्यांचा दोष नाही. पत्नी आणि इतर लोकांवर त्याने कठोर कारवाईची मागणी केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावात खळबळ माजली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.