थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:06 IST2025-12-05T12:04:49+5:302025-12-05T12:06:24+5:30
प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मात्र, यावेळी ही कहाणी चक्क आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि फिल्मी प्रकरण समोर आले आहे. एका पाकिस्तानी तरुणाने आपली प्रेम कहाणी वाचवण्यासाठी आणि पाकिस्तानातील पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतात प्रवेश केला. हा युवक सध्या बाडमेर पोलिसांच्या ताब्यात असून सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
प्रेयसीच्या कुटुंबियांनी केला गुन्हा दाखल
बाडमेर जिल्ह्यातील सीमावर्ती भाग सेडवा येथे २६ नोव्हेंबर रोजी हा पाकिस्तानी युवक भारतीय हद्दीत घुसल्याचे उघड झाले. गावकऱ्यांनी या संशयित तरुणाची माहिती तातडीने सीमा सुरक्षा दलाला दिली. बीएसएफने तात्काळ कारवाई करत या तरुणाला ताब्यात घेतले आणि नंतर बाडमेर पोलिसांच्या स्वाधीन केले.
सुरक्षा एजन्सीच्या संयुक्त समितीने जेव्हा या तरुणाची चौकशी केली, तेव्हा त्याने आपले नाव हिंदाल असल्याचे सांगितले. तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मीठी जिल्ह्यातील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान त्याने जी माहिती दिली, ती ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
पोलिसांपासून वाचण्यासाठी ३०० मीटर आत!
हिंदालने सांगितले की, त्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी हिंदालविरुद्ध पाकिस्तानात गुन्हा दाखल केला. पाकिस्तानात अटक होण्याच्या भीतीने त्याने हा मोठा धोका पत्करला. त्याने पोलिसांना सांगितले की, "मला अटकेत जायचं नव्हतं, त्यामुळे मी भारतीय सीमेत घुसलो आणि सुमारे ३०० मीटर आत येऊन एका शेतात गायींसाठी बनवलेल्या गोठ्यात लपून बसलो होतो." याच दरम्यान शेतात आलेल्या गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि तो संशयित वाटल्यामुळे बीएसएफला कळवले.
राष्ट्रविरोधी काहीच आढळले नाही!
बाडमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीना यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, हिंदालकडे कोणतीही संशयित वस्तू किंवा सामग्री आढळलेली नाही. तसेच, त्याची कोणतीही राष्ट्रविरोधी गतिविधी समोर आलेली नाही. केवळ प्रेमाच्या या गुन्ह्यामुळे तो सीमेपलीकडे आला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा पाकिस्तानकडे पाठवण्यासाठी बीएसएफला पत्र लिहिले आहे.