नवी मुंबईत थरार! आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोरुग्ण तरुणीला पोलिसांनी वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 19:10 IST2021-01-03T19:09:37+5:302021-01-03T19:10:05+5:30
Suicide Attempt : इमारतीच्या छतावरून सुटका : पोलिसांसह अग्निशमन जवानांचे धाडसी प्रयत्न

नवी मुंबईत थरार! आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोरुग्ण तरुणीला पोलिसांनी वाचवले
नवी मुंबई : वाशी येथील जय जवान इमारतीच्या छतावरून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला वाचवण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाला एक तास कसरत करावी लागली. सदर तरुणी मनोरुग्ण असून यापूर्वी देखील तिने असे प्रयत्न केले आहेत.
रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वाशी सेक्टर १७ येथील जय जवान इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर एक तरुणी उभी असल्याचे काहींनी पाहिले. हि तरुणी आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे कळताच वाशी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी सदर २० वर्षीय तरुणी त्याठिकाणी उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिची समजूत काढून तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिची मनस्थिती ठिक नसल्याने ती पोलिसांना प्रतिसाद देत नव्हती असे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. यामुळे एका बाजूने महिला पोलीस मानसी लाड यांनी तरुणीला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने पाण्याच्या टाकीवर चदलेल्या अमृत साळी यांनी तिच्यावर झडप घालून पकडून ठेवले. त्यानंतर हवालदार दत्तात्रय रोंगटे व इतर अग्निशमन जवानांनी तिला पकडून सुरक्षित खाली उतरवले.
या तरुणीने यापूर्वी पण आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याठिकाणी ती आजीसोबत रहायला आहे. तिच्या मनोरुग्ण अवस्थेमुळे तिच्या आईने यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. या धक्क्यामुळे वडील देखील वाशीतच तिच्यापासून वेगळे राहत आहेत.