२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:12 IST2025-07-24T13:12:04+5:302025-07-24T13:12:23+5:30
उत्तर प्रदेशात रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला

२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका चिमुकल्याचा नाहक जीव गेला. सोमवारी सकाळी लखनऊच्या ठाकूरगंज इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मनाप्रमाणे औषधांची किंमत लावून आणि आणि उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला असा आरोप करत कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबिय शांत झाले.
मुलगा जियान याला ताप आल्याने सोमयाने तिचा भाऊ मोहम्मद रफीसोबत उपचारासाठी ऑक्सिजन हॉस्पिटल गाठले होते. डॉक्टरांनी मुलाला तपासणी केल्यानंतर दाखल केले. उपचार सुरू झाल्यानंतर जियानमध्ये काही सुधारणा दिसून आल्या. त्यानंतर, रविवारी संध्याकाळी, डॉक्टरांनी उपचारासाठी आवश्यक असल्याचे सांगून कुटुंबाला ५०,००० रुपयांचे इंजेक्शन आणण्यास सांगितले. कुटुंबाने कसेबसे पैसे गोळा केले आणि इंजेक्शन आणून दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच मुलाची तब्येत आणखी बिघडू लागली.
डॉक्टरांनी दावा केला होता की इंजेक्शन दिल्यानंतर बाळ लवकर बरे होईल. मात्र त्याउलट झाल्याने कुटुंबिय देखील घाबरले. कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या जियानच्या वडिलांनी इंजेक्शनसाठी पैसे गोळा करता येत नसल्याचे सांगितल्यावर इंजेक्शनसाठी चाळीस हजार रुपये आकारण्यात आले. कुटुंबियांनी मुलाच्या मृत्यूनंतर, इंजेक्शनचे कव्हर तपासले असता त्याची किंमत फक्त २६,५१४.६२ रुपये असल्याचे समोर आलं.
रविवारी रात्री ११:३० वाजता जियाची प्रकृती बिघडत असल्याचे त्यांनी त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर
आणि कर्मचारी संतापले आणि त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा त्याच्या घशात एक नळी घालण्यात आली. ती नळी फुफ्फुसात अडकल्याचा आरोप आहे. ऑक्सिजन सपोर्ट देत असताना, तोंडात पाईप टाकताना त्याच्या फुफ्फुसांना छिद्र पडले. यानंतर, मुलाचे डोळे अचानक उलटले आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. एक्स-रेमध्ये ती नळी अडकल्याचे दिसून येत होते.
रात्रभर व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर सोमवारी सकाळी ६ वाजता मुलाला मृत घोषित करण्यात आले. सोमयाला तिच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच ती बेशुद्ध पडली. त्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऑक्सिजन हॉस्पिटलच्या संचालकाने सांगितले की, मुलाला जीबी सिंड्रोम होता आणि त्याची प्रकृती गंभीर असताना त्याला दाखल करण्यात आले होते. संपूर्ण टीमने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.