४५ लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 19:57 IST2022-03-13T19:57:20+5:302022-03-13T19:57:46+5:30
Crime News : पोलीस कर्मचारी गणेश शिंदे,गणेश कांबळे,दिलीप पिलाने अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

४५ लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांना अटक
नितिन पंडीत
भिवंडी - नाशिक मार्गे मुंबई येथे हवाला मार्गे रोख ४५ लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कार चालकास लुटल्याची घटना ८ मार्च रोजी नाशिक मुंबई महामार्गा वरील हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपा समोर घडली होती. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत तीन पोलिसांना नारपोली पोलिसांनी शनीवारी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी गणेश शिंदे,गणेश कांबळे,दिलीप पिलाने अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे ८ मार्च रोजी आपल्या कार मधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील पाच कोटी रुपयांची रोकड विविध बॅग मध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले असता नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर हे तीनहि आरोपी दबा धरून बसले होते. त्यांनी कार थांबवून कार मधील ४५ लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता . विशेष म्हणजे कार मध्ये पाच कोटी ची रक्कम असताना आरोपी पोलिसांना फक्त ४५ लाखांची टीप मिळाल्याने उर्वरित रक्कम बचावली असल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी सुरुवातीला पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले असता या गुन्ह्याची उकल झाली. त्याकडे कसून चौकशी केली असता पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे,गणेश कांबळे,दिलीप पिलाने यांचा सहभाग निश्चित झाला .या तिघा जणांनी कार चालकास थांबवून त्याकडील रक्कम लुबाडली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने या तिन्ही फरार असलेल्या आरोपी पोलीस कर्मचारी यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे .या सर्व चार ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे .