नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:11 IST2021-07-13T16:11:02+5:302021-07-13T16:11:38+5:30
Naxalist Supporter : गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई: आरोपींची संख्या झाली पाच

नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक
गोंदिया: नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. छत्रसाल उर्फ बंटी मोहन बानेवार (४८) रा. माडी मोहल्ला चावडी चौक छोटा गोंदिया, लक्ष्मीनारायण उर्फ बाळू दिगंबर कुंभारे (५३) रा. साई खापर्डे कॉलनी कुडवा व राजेश गोपीचंद पाटील (५१) रा. आंबेडकर चौक कुडवा या तिघांना अटक केली आहे.
नक्षलवाद्यांना शस्त्र पुरविणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केली होती. त्या घटनेचे धागेदोरे गोंदियापर्यंत लागले. त्यावेळी गोंदियातील घनश्याम आचले व विजय कोरेटी या दोघांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गोंदियातील आणखी तिघांना नक्षल समर्थक म्हणून अटक करण्यात आली आहे. बालाघाट जिल्ह्याच्या किरनापूर-किनी जंगलात नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्या जवळून तीन पिस्तूल, तीन मॅक्झिन, एके ४७, आठ मोबाईल, चारचाकी असलेले दोन वाहने, एलईडी टॉर्च, हवा पंप, एमपीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, कापड भरलेल्या तीन बॅग असा सामान जप्त करण्यात आला होता. नक्षलवाद्यांना पावसाळ्यापूर्वी ५ हजार काडतुसे, पिस्तूल, शस्त्रे दारुगोळा, शिबीर लावण्याचे साहित्य पुरविण्यासाठी एक कोटी रुपयांचा सौदा झाला होता. यातील ३० लाख रुपयाचे सामान मागील सहा महिन्यात नक्षलवाद्यांना पुरविल्याची माहिती आहे. या प्रकरणात नक्षल समर्थक म्हणून काम करणाऱ्या गोंदियातील तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गोंदिया बालाघाट पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी, नक्षल विरोधी अभियान पथक गोंदियाचे शरद पाटील, बालाघाटचे पीएसआय उके यांनी केली आहे.