धक्कादायक! सुट्टी दिली नाही म्हणून तीन सहकाऱ्यांवर केला चाकूने हल्ला; सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:58 IST2025-02-06T16:56:06+5:302025-02-06T16:58:38+5:30
एका सरकारी कर्मचाऱ्याने सुट्टी मिळाली नाही म्हणून आपल्याच सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! सुट्टी दिली नाही म्हणून तीन सहकाऱ्यांवर केला चाकूने हल्ला; सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप
कोलकाता येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्याच सहकऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. हा वेडा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून हा कर्मचारी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामध्ये काम करतो. या कर्मचाऱ्याने चार जणांवर चाकूने वार केले आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये आरोपी हातात चाकू घेऊन फिरताना दिसत आहे. आरोपीने त्याच्या कार्यालयात रजेसाठी अर्ज केला होता, पण काही कारणास्तव त्याची रजा मंजूर झाली नाही. यामुळे तो तरुण संतापला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अमित कुमार असे आहे. रजा न मिळाल्याने संतप्त झालेल्या आरोपीने त्याच्या ऑफिसबाहेर रस्त्यावर त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी १२:३० च्या सुमारास न्यू टाउन टेक्निकल एज्युकेशन बिल्डिंगजवळ ही घटना घडली. आरोपीही याच कार्यालयात काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, रजा न मिळाल्याने आरोपी रागाच्या भरात कार्यालयातून निघून गेला. दरम्यान, समोरून येणाऱ्या त्याच्या तीन सहकाऱ्यांनी त्याला त्याच्या रागाचे कारण विचारले. यामुळे त्याचा राग आणखी वाढला त्याने त्या सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केला.
सहकाऱ्यांवरच केला हल्ला
रागाच्या भरात आरोपीने तिन्ही सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. यानंतर, आरोपी हातात तोच चाकू घेऊन रस्त्यावर फिरताना दिसला. माहिती मिळताच घटनास्थळी तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीला चाकू फेकण्यास सांगण्यात आले. आरोपीने काही काळ हातात चाकू ठेवला, पण नंतर तो फेकून दिला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याला टेक्नो सिटी पोलिस ठाण्याने अटक केली आहे.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी अमितने सांगितले की त्याने रजेसाठी अर्ज केला होता परंतु तिथून त्याच्या आणि त्याच्या वडिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या. यामुळे तो संतापला आणि त्याने हा गुन्हा केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.