तिघांवर कटरने हल्ला, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार; रेणापुरात एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 02:40 IST2023-07-09T02:40:05+5:302023-07-09T02:40:33+5:30
याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.

तिघांवर कटरने हल्ला, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार; रेणापुरात एकाला अटक
लातूर : तू माझ्याकडे रागाने का बघितल? म्हणून एकाने तिघांवर कटर-चाकूहल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील रेणापुरात शनिवारी सकाळी घडली. यातील जखमीवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, शकील फकीर शेख (वय ४०, रा. रेणापूर ) हा सोहेल पाशा सय्यद (वय २३, रा. रेणापूर ) यास तू माझ्याकडे रागाने का बघितलास? असे म्हणून शिवीगाळ करत अंगावर येत मारहाण करू लागला. त्यावेळी सोहेल सय्यद यांनी त्यास बाजूला केले. त्यावेळी शकील शेख याने त्याच्या खिशातील लोखंडी कटर काढून सोहेल याच्यावर हल्ला केला. शेजारी असलेल्या सोहेल याचे मित्र धम्मानंद चक्रे आणि चंदर उर्फ बबलू चक्रे हे भांडण सोडवण्यासाठी धावत आले. यावेळी शकीलने धम्मानंद चक्रे यांच्या डोक्यात, बरगडीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. चंदर ऊर्फ बबलू चक्रे यांच्यावरही हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक अंगत्रे, सपोनि बालाजी भंडे, अभिजित थोरात, अनंत बुधोडकर, सिद्धेश्वर मदने, शिवराज आनंतवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तिघांना रेणापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर शकील शेख हा फरार झाला होता; मात्र त्याला पाेलिसांनी अटक केली.
याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात सोहेलपाशा सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून शकील फकीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.