19 वर्षीय तरुणाच्या हत्येतील तीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 14:52 IST2023-04-01T14:50:24+5:302023-04-01T14:52:37+5:30
पहाटे साडेतीनच्या सुमारास वडील आणि बहिणीला जागा आल्यानंतर विनयची शोधाशोध सुरू झाली. यावेळी मोर्चुला तलावाच्या गणपती घाटाजवळ विनयचा मृतदेह सापडला.

19 वर्षीय तरुणाच्या हत्येतील तीन आरोपींना अटक
- मयूर तांबडे
नवीन पनवेल : शिवकर येथील 19 वर्षीय विनय विनोद पाटील यांची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष तीनने तीन आरोपींना अटक केली आहे.
यातील तिन्ही आरोपी 29 मार्च रोजी रात्री दोनच्या दरम्यान गावात कोंबड्या चोरण्यासाठी आले होते. यावेळी ते विनयच्या घरात मोबाईल चोरण्यासाठी आले असता विनय पाटील याला जाग आली. त्याला चोर दिसले. यावेळी विनयला पाहून चोर पळु लागले. त्यांच्या पाठोपाठ विनय देखील घरातून बाहेर पडला व त्यांने चोरांचा पाठलाग सुरू केला. यावेळी या तिन्ही चोरट्यांनी विनयला पकडले आणि पोटात चाकूने जखम केली आणि धारदार हत्याराने आणि कुऱ्हाडीने शरीरावर अनेक वार केले. यात विनयचा जागीच मृत्यू झाला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास वडील आणि बहिणीला जागा आल्यानंतर विनयची शोधाशोध सुरू झाली. यावेळी मोर्चुला तलावाच्या गणपती घाटाजवळ विनयचा मृतदेह सापडला. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पनवेल पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखा कक्ष तीनने तिन्ही आरोपींना शिवकर- उसरली गावाच्या मध्ये असणाऱ्या समर्थ बेकरी जवळून तिघांना अटक केली..