वरळी आग दुर्घटनेत तिसरा मृत्यू; चार महिन्यांचे बाळ व वडिलांनंतर आईनेही प्राण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:27 IST2021-12-06T20:26:58+5:302021-12-06T20:27:26+5:30
वरळी बीडीडी चाळीमधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पुरी कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वरळी आग दुर्घटनेत तिसरा मृत्यू; चार महिन्यांचे बाळ व वडिलांनंतर आईनेही प्राण सोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - वरळी गॅस सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या चौघांवर नायर रुग्णालयात उपचार करण्यास दिरंगाई झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र चौकशीचा अहवाल येण्याआधीच डॉक्टरांचा कथित हलगर्जीपणा तिघांच्या जीवावर बेतला आहे. या दुर्घटनेत जखमी चार महिन्यांच्या बाळाचा व त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सोमवारी त्या बाळाच्या आईने देखील अखेरचा श्वास घेतला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व संताप व्यक्त होत आहे.
वरळी बीडीडी चाळीमधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पुरी कुटुंबातील चारजण जखमी झाले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, नायर रुग्णालयात तब्बल पाऊणतास या जखमींवर उपचार करण्यात आले नाहीत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. उपचार मिळण्यास विलंब झाल्याने या दुर्घटनेत जखमी चार महिन्यांच्या बाळाचा १ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तर त्याचे वडील, आई आणि पाच वर्षांच्या भावावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, शनिवारी आनंद पुरी (वय २७) यांचा देखील मृत्यू झाला.
या दुर्घटनेत ५० टक्के जखमी झालेल्या विद्या पुरी (वय २५) यांचे सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. तर १५ ते २० टक्के जखमी झालेला त्यांचा थोरला मुलगा विष्णू पुरी (वय ५) याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी हलगर्जीचा ठपका असलेल्या दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ सदस्यांच्या समितीमार्फत सुरु आहे.