चोरट्यांनी भाजपा नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून तिजोरी लांबवली, पन्नास तोळे सोने, किमती घड्याळ लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:26 PM2021-10-24T14:26:38+5:302021-10-24T14:27:04+5:30

Crime news: भाजपा नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. तिजोरीत ४० ते ५० तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि इतर मौल्यवान चीज वस्तू होते, असे सांगितले जाते.

Thieves snatch safe from BJP corporator Sandeep Gawai's house | चोरट्यांनी भाजपा नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून तिजोरी लांबवली, पन्नास तोळे सोने, किमती घड्याळ लंपास

चोरट्यांनी भाजपा नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून तिजोरी लांबवली, पन्नास तोळे सोने, किमती घड्याळ लंपास

googlenewsNext

नागपूर : भाजपा नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. तिजोरीत ४० ते ५० तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि इतर मौल्यवान चीज वस्तू होते, असे सांगितले जाते. रविवारी सकाळी चोरीची ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.

रमा नगर, शताब्दी चौक परिसराचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करणारे गवई गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारिपहाड परिसरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरला ते नागपुरातून बाहेर गेले. घरात त्यांचे नातेवाईक होते. २२ऑक्टोबरला ते परत आले. आज २४ ऑक्टोबरला त्यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे धाडसी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.

गवई यांच्या शयनकक्षाच्या बाजूला ठेवलेली तिजोरी चोरट्यांनी उचलून नेली. या तिजोरीत ४० ते ५० तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि इतर मौल्यवान चीज वस्तूंसह ४० ते ५० लाख रुपयांचा ऐवज होता, असे समजते. या धाडसी चोरीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी गवई यांच्या निवासस्थानी गर्दी केली. पोलिसांनी श्वान तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक बोलवून घेतले. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा उलगडा करण्याचे प्रयत्न करीत होते.

दोन दिवसांचे गौडबंगाल
या धाडसी चोरीत अनेक पैलू संशयास्पद आहेत. चोरट्यांनी घरातील कोणत्याच दुसऱ्या वस्तूंना हात लावला नाही किंवा छेडछाड केली नाही. फक्त तिजोरीच उचलून नेली. ही बाब पोलिसांना खटकत आहे. त्यामुळे या चोरीत संपर्कातील कोणी व्यक्ती असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. विशेष म्हणजे, गवई दोन दिवसांपूर्वी घरी परतले आणि आज त्यांनी चोरीची माहिती पोलिसांना कळविली. या दोन दिवसात त्यांना चोरी झाल्याचे लक्षात कसे आले नाही, या मुद्द्यावरही पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Thieves snatch safe from BJP corporator Sandeep Gawai's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.