खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:05 AM2019-03-18T02:05:30+5:302019-03-18T02:06:12+5:30

खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासूनचोरट्यांनी विविध ठिकाणी धुमाकूळ घातला असून गेल्या आठवड्यात महिलांच्या गळ्यातील साखळी, मोबाईल व दुचाकीचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Thieves in Khed taluka | खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस हतबल

खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस हतबल

googlenewsNext

दावडी - खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासूनचोरट्यांनी विविध ठिकाणी धुमाकूळ घातला असून गेल्या आठवड्यात महिलांच्या गळ्यातील साखळी, मोबाईल व दुचाकीचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडाभरात चोरट्यांनी विविध ठिकाणी केलेल्या त्यांनी चोरीमध्ये ६ लाख ५ रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या मोबाईल, दागिने, रोकड हिसकावून पळ काढण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या चोरट्यांपुढे पोलीस यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात केवळ निर्जनस्थळी सोन्यावर डल्ला न मारता भरवस्तीत आणि रहदारीच्या रस्त्यांवरही दिवसाढवळ्या या घटना घडत आहेत. त्यातही सुटीच्या दिवशी आणि लग्नसराईच्या दिवसांत हे प्रमाण लक्षणीय आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून चोरट्यांनी विविध ठिकाणी धुमाकूळ घातला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांजवळील किमती ऐवज चोरीस जाण्याचे प्रकार वाढले असून, या स्थानकात साध्या वेषातील पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी गर्दीत सावधानता बाळगावी, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा. जास्त रक्कम असल्यास काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी केले आहे.

खेड पोलिसांची तपास पथके या चोरांचा तपास करीत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खेड शहरासह परिसरात कसून चौकशी सुरू केली आहे. या चोरांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

बुधवारी (दि. १३) शहरातील पाण्याच्या टाकीजवळ फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. सुनीता दीपक घुमटकर या वाडा रस्त्यावर सकाळी घरी येताना पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीवरून अज्ञात दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ५० हजार रुपयांचे हिसकावून नेले. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र चोरट्यांनी मुद्देमाल हिसकावून तेथून पळ काढला.

गुरुवारी (दि. १४) राक्षेवाडी (ता. खेड) येथील बबन काशिनाथ खिलारे यांनी राजगुरुनगर एसटी स्टँडजवळील हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याजवळ हिरो होंडाची मेस्ट्रो स्कूटी उभी केली होती. त्यामध्ये मोबाईल होता. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकीसह मोबाईल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

श्ुक्रवारी (दि. १५) दावडी (ता. खेड) येथील ज्येष्ठ महिला रखमाबाई मोहन डुंबरे (वय ४८) या दावडी येथे जाण्यासाठी ५ वाजता राजगुरुनगर येथील एसटी बसस्थानकात आल्या होत्या. एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी डुंबरे यांच्या गळ्यातील पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले.

Web Title: Thieves in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.