चोरट्यांनी पोलिसासह आणखी एकाचे घर फोडले; ६ ते ७ लाखांची जबरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 22:32 IST2022-07-20T22:32:02+5:302022-07-20T22:32:40+5:30
Crime News : दिवसाढवळ्या चोरट्यांनी जबरी चोरी करीत, पोलिसांना आव्हान दिले आहे.

चोरट्यांनी पोलिसासह आणखी एकाचे घर फोडले; ६ ते ७ लाखांची जबरी चोरी
अकोला: तीन चोरट्यांनी अपार्टमेंटमधील दोन घरे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ८ ते १० लाख रूपयांचा ऐवज लांबविल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यापैकी एक फ्लॅट एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गीता नगरात घडली. याप्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसाढवळ्या चोरट्यांनी जबरी चोरी करीत, पोलिसांना आव्हान दिले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी सुभाष दंदी यांच्या तक्रारीनुसार गीता नगरातील भानु अपार्टमेंट ते राहत असून, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घरी परतले असता, त्यांना घरात तीन चोरटे दिसून आले, त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवित पळ काढला.
या दरम्यान पोलीस कर्मचारी सुभाष दंदी यांची घरात आणि खाली रस्त्यावर चोरट्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी आरडाओरड केली असता, नागरिक गोळा झाले. मात्र तोपर्यंत त्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत पळ काढला. दंदी यांच्या घरातून तीन लाख रूपयांचा ऐवजावर हात साफ सांगितले जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनांमुळे गीता नगर परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत.
दुसऱ्या घरातून ऐवज लंपास
विजय त्र्यंबक गोपनारायण यांच्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मुली शिकवणी वर्गाला गेल्या होत्या आणि पत्नी ज्योती या भाजी बाजारात गेल्या होत्या. त्या ५.३० वाजता परतल्या. यादरम्यान एका तासात चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने आणि तीन ते चार हजार रुपये रोख लंपास केला.
पोलीस कर्मचाऱ्यासोबत हाणामारी
पोलीस कर्मचारी दंदी हे घरी परतल्यावर त्यांना घरात तीन चोरटे चोरी करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांच्या हातात चाकू असल्याने, त्यांना प्रतिकार करता आला नाही. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. दंदी यांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यात हाणामारीही झाली. परंतु चाकूमुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.