चोरी करायला आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी बेदम चोपलं; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:21 IST2025-07-24T18:18:52+5:302025-07-24T18:21:42+5:30
अहिल्यानगरमध्ये जमावाच्या मारहाणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने चोरट्याचा मृत्यू झाला.

चोरी करायला आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी बेदम चोपलं; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
Ahilyanagar Crime:अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील सुपा येथे पवारवाडीत बुधवारी पहाटे चोरीच्या उद्देशाने आलेल्या २६ वर्षीय तरुणाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर तरुणाला सुपा टोल नाक्यावर सोडून देण्यात आलं होतं. मात्र सकाळी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हितेशकुमार रविवेश्वरप्रसाद असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हितेशकुमार याच्यासमवेत असलेले इतर दोन चोरटे पसार झाले. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनास्थळी विभागीय अधिकारी अमोल भारती, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी भेट देत अधिक माहिती घेतली.
नगर-पुणे महामार्गावर सुपाजवळील पवारवाडी घाटात एका दुकानावर चोरटे आल्याची माहिती गावातील काही नागरिकांना समजली. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केल्याने ते पसार झाले. त्यानंतर, काही वेळात पवारवाडी परिसरातील नागरिकांनी वाघुंडे टोल नाक्याजवळ चोरट्यांना घेरले. यावेळी तीनपैकी एका चोरट्यास पकडत, त्याला जमावाने बेदम मारहाण केली. दरम्यान, याबाबत अज्ञात व्यक्तीने सुपा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमी चोराला पोलीस ठाण्यात आणले. मात्र, त्याच्या छाती व पोटात दुखू लागल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान हितेशकुमार याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा चोरट्याचे नाव हितेशकुमार रविवेश्वरप्रसाद असे असल्याचे समोर आलं. दरम्यान, मारहाणीत मृत्यू झालेल्या हितेशकुमारकडे तीन आधार कार्ड सापडली. त्यामुळे त्याचे नेमके नाव काय हे पोलिसांना समजत नव्हते. शेवटी पॅन कार्डच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली. मयत हितेशकुमार हा परप्रांतीय कामगार असल्याचे समोर आले.