क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:27 IST2025-08-25T20:26:57+5:302025-08-25T20:27:28+5:30
आरोपीने महिलेच्या तोंडात स्फोटक पदार्थ घालून स्फोट घडवला, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आणि तिचा मृत्यू झाला.

AI Generated Image
कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यातील एका गावातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे एका २० वर्षीय विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने क्रूरपणे हत्या केली. आरोपीने महिलेच्या तोंडात स्फोटक पदार्थ घालून स्फोट घडवला, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह एका लॉजच्या खोलीत पलंगावर पडलेला आढळला, तर खोलीच्या जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते.
मृत महिलेची ओळख पटली
पोलिसांनी मृत महिलेची ओळख रक्षिता म्हणून पटवली आहे, जी गेरासनहल्लि गावाची रहिवासी होती. रक्षिताचा विवाह केरळमधील एका मजुरासोबत झाला होता, पण तिचे तिच्या नातेवाईक असलेल्या सिद्धराजु सोबत प्रेमसंबंध होते.
रविवारी हे दोघे भेर्या गावातील एका लॉजमध्ये थांबले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार भांडण झाले. याच वादातून आरोपीने महिलेच्या तोंडात बॉम्ब सदृश स्फोटक पदार्थ घातला आणि खाणींमध्ये जिलेटिनच्या कांड्या उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिगरचा वापर करून स्फोट घडवला.
आरोपीचा बनाव उघड
हल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की महिलेचा मृत्यू मोबाइल फोनच्या स्फोटामुळे झाला आहे. पण, त्याच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.