संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:45 IST2025-07-06T14:45:08+5:302025-07-06T14:45:43+5:30
जुन्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून हा वाद इतका विकोपाला जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती. पण...

संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्युडी खुर्दकला गावात एका काकीने आपल्याच पुतण्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. जुन्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून हा वाद इतका विकोपाला जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती.
काय आहे प्रकरण?
गावात राहणाऱ्या उमाकांत याचा त्याचे काका चरन पाल आणि काकी अनिता देवी यांच्यासोबत वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. शनिवारी सकाळी अनिता देवीचा उमाकांतच्या कुटुंबासोबत पुन्हा वाद झाला होता. त्यावेळी उमाकांत घरी नव्हता; तो रोजच्याप्रमाणे जरी कारखान्यात मजुरी करण्यासाठी गेला होता.
काकीने केला जीवघेणा हल्ला
सायंकाळी उमाकांत काम संपवून घरी परत येत असताना, त्याची काकी अनिता देवी आपल्या घराच्या दारात उभी होती. उमाकांत तिच्या दारासमोरून जात असताना, अनिता देवीने अचानक त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. उमाकांतला सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदातच तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. उमाकांतच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक आणि त्याचे कुटुंबीय धावत आले. रक्ताने माखलेल्या उमाकांतला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. हे ऐकून कुटुंबात हाहाकार माजला. आई-वडील आणि भावंडं हंबरडा फोडून रडू लागले.
पोलिसांकडून तपास आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच भुता पोलीस ठाण्याचे पोलीस, सीओ फरीदपूर संदीप सिंह आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथक गावात पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळ सील केले. फॉरेन्सिक तज्ञांनी रक्ताचे नमुने, चाकूचे निशाण आणि आजूबाजूच्या परिस्थितीची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
उमाकांतच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अनिता देवीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अनिता देवीला ताब्यात घेतले. चौकशीत अनिता देवीने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, जमिनीच्या वाटणीवरून तिचा उमाकांत आणि त्याच्या कुटुंबाशी दीर्घकाळापासून वाद सुरू होता. अनेकवेळा पंचायतही बसली, पण प्रकरण मिटले नाही. अखेर रागाच्या भरात तिने पुतण्याची हत्या केली.
सीओ फरीदपूर संदीप सिंह यांनी सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध हत्येच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिला तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.