'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:25 IST2026-04-11T13:25:03+5:302026-04-11T13:25:43+5:30

गोरखपूरमध्ये प्रेमविवाहाला घरच्यांनी नकार दिल्याने एका तरुणीने पोलीस ठाण्यातच विष प्राशन केले. दुसरीकडे लग्न ठरल्याने ती संतापली होती.

The young woman said, 'I will marry him'; Even though the police called her, her family refused and a shock ensued | 'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार

AI Generated Image

ज्या व्यक्तीसोबत आयुष्याची स्वप्ने पाहिली, त्याच्याशीच लग्न व्हावे यासाठी एक तरुणी आपल्या कुटुंबाशी नडली. मात्र, घरच्यांनी कडाडून विरोध केला आणि दुसरीकडे लग्न ठरवले. याच विवंचनेतून आणि रागातून उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका तरुणीने चक्क पोलीस ठाण्यातच कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पिपराईच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून, तरुणीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

घर सोडून गेली होती तरुणी

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ८ एप्रिल रोजी संध्याकाळी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. मुलीचा थांगपत्ता लागत नसल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी ती तरुणी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की, तिचे एका तरुणावर प्रेम असून तिला त्याच्याशीच लग्न करायचे आहे.

दुसरीकडे लग्न ठरल्याने संताप

तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न २९ एप्रिल रोजी दुसऱ्याच एका तरुणासोबत निश्चित केले होते. या निर्णयाला तिचा विरोध होता. पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिथे बराच वेळ मुलीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलीस ठाण्याच्या आवारातच तासनतास हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू होता. मुलगी आपल्या प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम होती, तर पालकांनी या आंतरजातीय किंवा प्रेमविवाहाला स्पष्ट नकार दिला.

पोलीस ठाण्यातच हाहाकार

पालकांनी लग्नाला साफ नकार दिल्याचे पाहून तरुणीचा धीर सुटला. तिने सोबत आणलेली कीटकनाशकाची बाटली काढली आणि पोलिसांदेखतच विष प्राशन केले. हा प्रकार पाहून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. विष पिऊन ती बाहेरच्या दिशेने धावू लागली, मात्र गेटवरच महिला पोलिसांनी तिला पकडले. काही वेळातच तिची प्रकृती बिघडून उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी तत्काळ तिला जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले.

एसपी नॉर्थ ज्ञानेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्याने ती मानसिक तणावाखाली होती. पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला असून, याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title : प्रेमी से शादी पर अड़ी युवती, थाने में आत्महत्या का प्रयास

Web Summary : गोरखपुर में परिवार द्वारा दूसरी जगह शादी तय करने से नाराज युवती ने थाने में जहर पीकर आत्महत्या का प्रयास किया। परिजनों ने प्रेमी से शादी से इनकार किया था, जिससे वह परेशान थी।

Web Title : Girl adamant on marrying lover; attempts suicide in police station.

Web Summary : Upset over her family arranging a marriage with someone else, a young woman in Gorakhpur, Uttar Pradesh, attempted suicide by consuming pesticide at the police station after her parents refused her wish to marry her lover.