घरगुती वादातून संतापलेल्या ईशा नावाच्या महिलेने आपल्या पतीची जीभ चक्क दातांनी तोडून वेगळी केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण मोदीनगर परिसर हादरला असून, जखमी पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी ही महिला पोलिसांसमोरच पतीला 'नामर्द' म्हणत धमकावत आहे.
काय आहे नेमका प्रकार?
संजयपुरी कॉलनीतील रहिवासी विपिन (२६) याचा विवाह मे २०२५ मध्ये मेरठच्या ईशाशी झाला होता. लग्नाच्या सुरुवातीपासूनच दोघांमध्ये खटके उडत होते. १९ जानेवारीच्या रात्री १ च्या सुमारास बेडरुममध्ये त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या ईशाने विपिनची जीभ दातांनी इतक्या जोरात चावली की ती तुटून वेगळी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विपिनला तातडीने मेरठच्या सुभारती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या मते आता तो कधीही सामान्यपणे बोलू शकणार नाही.
"तो नामर्द आहे, माझे जबरदस्ती लग्ने लावले!"
पोलीस कोठडीत असताना ईशाने जे खुलासे केले ते ऐकून अधिकारीही चक्रावून गेले. ईशा म्हणाली, "माझा पती नामर्द होता, त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मला तो मुलगा आधीच आवडत नव्हता, पण घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले. तो दारू पिऊन माझ्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि माझ्यावर संशय घ्यायचा."
सोशल मीडिया रील आणि बॉयफ्रेंडचे कनेक्शन
या वादामागे इन्स्टाग्राम रीलचे कनेक्शनही समोर आले आहे. ईशाला सोशल मीडियावर रील बनवण्याची आणि सक्रिय राहण्याची आवड होती, मात्र विपिनचा त्याला विरोध होता. तो तिचा फोन चेक करायचा, ज्यावरून त्यांच्यात नेहमीच मारामारी व्हायची. शिवाय, लग्नानंतरही ईशा तिच्या मेरठमधील जुन्या प्रियकराच्या संपर्कात होती आणि तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे, असेही तिने निर्लज्जपणे कबूल केले.
"जीभच तर कापली, १० दिवसात बाहेर येईन"
बुधवारी जेव्हा पोलिसांनी ईशाला न्यायालयात हजर केले, तेव्हा तिने पोलिसांना विचारले, "मी १० दिवसात जामिनावर बाहेर येईल ना? मी त्याच्यावर हल्ला थोडीच केलाय, फक्त जीभच तर कापली आहे." एवढेच नाही तर जेलमधून बाहेर आल्यावर सासरच्यांवर हुंडाबळी आणि अनैसर्गिक संबंधांचे गुन्हे दाखल करण्याची धमकीही तिने दिली आहे.
सासरच्यांचे आरोप
विपिनच्या आई-वडिलांनी सांगितले की, ईशा सुरुवातीपासूनच विपिनचा तिरस्कार करत असे. ती लग्नानंतर जास्तीत जास्त वेळ माहेरीच राहायची. आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठीच तिने हा क्रूर कट रचल्याचा आरोप सासरच्यांनी केला आहे. मोदीनगर पोलिसांनी आरोपी ईशाला अटक करून तुरुंगात धाडले असून, कलम ३२६ (गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.