शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:04 IST2025-11-03T17:03:18+5:302025-11-03T17:04:06+5:30
विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, डोक्यावर फेटा आणि वरात घेऊन निघण्याच्या तयारीत असलेल्या एका नवरदेवाला ऐनवेळी एक असा कॉल आला अन्..

AI Generated Image
विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, डोक्यावर फेटा आणि वरात घेऊन निघण्याच्या तयारीत असलेल्या एका नवरदेवाला ऐनवेळी एक असा कॉल आला, ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते, ती चक्क लग्नाच्या आदल्या रात्रीच आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. एकीकडे त्यांचे लग्न टर मोडलेच, पण केलेल्या मोठा खर्च वाया गेल्यामुळे संतप्त नवरदेव पक्षाने थेट पोलीस ठाणे गाठून वधू पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे लग्नाची लगबग अन् आला धक्कादायक कॉल!
उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील बाजपूर नगर पालिका क्षेत्रातील एका तरुणाचे उत्तर प्रदेशातील सीमेवरील एका गावातील तरुणीसोबत लग्न ठरले होते. ठरल्यानुसार, रविवारी हा विवाहसोहळा पार पडणार होता. नवरदेवाच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. नवरदेव अत्यंत उत्साहाने तयार झाला होता. डोक्यावर फेटा बांधून आणि शेरवानी परिधान करून तो केवळ वरात निघण्याची वाट पाहत होता.
मात्र, याच दरम्यान वधू पक्षाकडून त्याला एक धक्कादायक फोन आला. नवरीबाई लग्नाच्या आदल्या रात्रीच तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे या फोनवरून नवरदेवाला कळवण्यात आले.
लाखो रुपयांचा खर्च, बदनामीमुळे वधू पक्षाविरुद्ध तक्रार
ऐनवेळी मिळालेल्या या बातमीमुळे नवरदेवाच्या कुटुंबात एकच गोंधळ उडाला आणि आनंदाचे रूपांतर तणावात झाले. संतप्त झालेल्या नवरदेव पक्षाच्या कुटुंबीयांनी तातडीने बाजपूर कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले की, विवाहाच्या तयारीसाठी लाखो रुपयांचा मोठा खर्च झाला आहे. केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मानहानीचा सामना देखील करावा लागत आहे.
पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न; प्रेमी युगुलाचा शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव पक्षाच्या तक्रारीवरून वधू पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाजपूरचे एसएसआय जसविंदर सिंह यांनी या घटनेची माहिती दिली. हे प्रकरण कौटुंबिक स्वरूपाचे असल्याने, पोलिसांनी दोन्ही बाजूंना सामंजस्याने आणि आपसी सहमतीने यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, फरार झालेल्या नवरीबाईचा आणि तिच्या प्रियकराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.