सेक्स्टॉर्शनचा नवा फंडा, बेरोजगार तरुण-तरुणींची भलतीच कोंडी!
By नरेश डोंगरे | Updated: December 7, 2024 23:55 IST2024-12-07T23:52:41+5:302024-12-07T23:55:36+5:30
एक्सपर्ट धावले मदतीला : सायबर गुन्हेगारांच्या कचाट्यातून सुटका

सेक्स्टॉर्शनचा नवा फंडा, बेरोजगार तरुण-तरुणींची भलतीच कोंडी!
- नरेश डोंगरे
नागपूर : तरुण-तरुणीच नव्हे तर अगदी म्हाताऱ्यांनाही बदनामीची भीती दाखवून सेक्स्टॉर्शन करणाऱ्या आणि लाखोंचा गंडा घालून त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी सेक्स्टॉर्शनचा नवा फंडा शोधला आहे. आता त्यांनी जॉब प्लेसमेंट साईट उघडून त्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना जाळ्यात ओढणे सुरू केले आहे. त्यांच्या जाळ्यात फसलेल्या तरुण-तरुणींची अशीच दोन प्रकरणे पुढे 'लोकमत'कडे आली आहेत.
मोठमोठ्या कॉर्पेोरेट कंपन्याच नव्हे तर छोट्या मोठ्या कंपन्याही अलिकडे ऑनलाईन जॉब प्लेसमेंट करू लागल्या आहेत. वेगवेगळ्या जॉब साईटवर कुठे काय रिक्त पद आहे, त्याची माहिती मिळत असल्याने रोज हजारो तरुण-तरुणी या साईट सर्च करतात. गेल्या आठवड्यात अशाच एका तरुणाने वेगवेगळ्या साईट धुंडाळल्या. त्यावर त्याने जिममधील आपले छान (बॉडी बिल्डर) व्हिडिओ, फोटोही अपलोड केले. लगेच त्याला ऑफर मिळाली.
विनाकपड्यात सिक्स पॅक बॉडीचा व्हिडिओ पाठविल्यास तुला लगेच हजारो रुपये आणि नंतर प्रत्येक महिन्याला आकर्षक मोबदला मिळेल. तुझा चेहरा आम्ही कुणालाही दाखविणार नाही, असेही सांगण्यात आले. फोटो व्हिडिओ पाठविल्याच्या काही तासातच मोबदला म्हणून हजारो रुपये मिळणार असल्याने तो हुरळला. त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता, मागणी प्रमाणे वेगवेगळ्या अँगलने फोटो, व्हिडिओ पाठविले.
पुढच्या काही तासातच आपल्याला ऑनलाईन पेमेंट मिळणार, या कल्पनेत असलेल्या तरुणाला तासाभरातच ब्लॅकमेल करणे सुरू झाले. अमूक खात्यात तातडीने रक्कम जमा कर, अन्यथा तुझे न्यूड फोटो, व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करू, अशी धमकी सायबर गुन्हेगारांनी दिली. प्रचंड मानसिक दडपण आलेल्या या तरुणाने काही हजार रुपये गुन्हेगारांना पाठविलेही. नंतर मात्र पैशाची मागणी सुरूच असल्याने त्याने आपली कैफियत मित्रांना ऐकवली अन् नंतर त्याची त्यातून सुटका झाली.
दुसरा प्रकार याहीपेक्षा भयंकर आहे. मॉडल बणन्याची हौस असलेल्या एका गरिब बेरोजगार तरुणीला टॉपलेस फोटो पाठविल्यास महिन्याला लाखो रुपये मिळणार आणि तुझी ओळख अथवा चेहरा कुणाला दाखविणार नाही, अशी आश्वस्त करणारी ऑफर मिळाली. ईतक्या सहजपणे स्वप्नपुर्ती होत असल्याचे पाहून तिनेही आततायीपणाने नको तसे फोटो सायबर गुन्हेगारांना पाठविले अन् पुढच्या काही मिनिटांपासून तिची ब्लॅकमेलिंग सुरू झाली.
ओळख जाहीर करणार नाही, असे म्हणणाऱ्यांनी तिला मोठ्या रकमेची मागणी केली, पैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे तिचे अवसानच गळाले. विष खाण्याच्या मानसिकतेत असताना तिला एका वकिलांनी आधार देऊन तिची सायबर गुन्हेगारांच्या कचाट्यातून सुटका केली.
सावध व्हा, घाबरू नका !
सेक्स्टॉर्शन करणारे गुन्हेगार अलिकडे नवे फंडे शोधून तरुण-तरुणींची फसवणूक करीत आहेत. अनेक जण बदनामीच्या धाकाने गप्प बसून सायबर गुन्हेगारांना पैसे पाठवितात. त्यामुळे अशा प्रकारे कोंडी झाल्यास काय करावे, याबाबत 'लोकमत'ने सायबर गुन्हेगारीचे अभ्यासक, ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. महेंद्र लिमये यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, सावधगिरी हा एक अत्यंत चांगला उपाय आहे. सायबर गुन्हेगार धमकावत असेल तर घाबरू नये, लगेच पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.