अट्टल चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; सापळा रचत दोघांना अटक, ९ लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:16 IST2025-08-22T21:15:56+5:302025-08-22T21:16:17+5:30
१८ गुन्ह्यांचा उलगडा, १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, भंगारवालाही ताब्यात, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यामध्ये १४ जणांच्या टाेळीने घातला धुमाकूळ

अट्टल चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; सापळा रचत दोघांना अटक, ९ लाखांची रोकड जप्त
राजकुमार जाेंधळे
लातूर : साखर कारखान्याचे गाेदाम फाेडणाऱ्या अन् घरफाेड्या करणाऱ्या टाेळीतील दाेघांना स्थागुशाच्या पथकाने मुरूड येथून शुक्रवारी दुपारी उचलले. १५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चाैकशीत १८ गुन्ह्यांचा उलगडा झाला. या अट्टल टाेळीने लातूर-धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत धुमाकूळ घातल्याचे अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
लातुरात घरफाेडी, पशुधन चाेरी, गाेदाम फाेडल्याच्या घटना घडल्या. आराेपींच्या अटकेचे आदेश पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे यांनी दिले. स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर यांच्या पथकाने टाेळीचा माग काढला. खबऱ्याच्या माहितीनुसार मुरूड रेल्वे स्टेशन चौकात सापळा लावला. यावेळी रमेश उद्धव चव्हाण (२६, रा. ढोकी, जि. धाराशिव), शिवाजी लाला काळे (४५, रा. वाटवडा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमध्ये ९ लाख २५ हजारांची राेकड आढळली. त्यांनी साथीदारांसाेबत घरफाेड्या, पशुधन चाेरी, कारखान्याचे गनमेटल वस्तू चाेरल्याचे कबूल केले. ही राेकड पशुधन, दागिने विक्रीतून आली. किल्लारी, भादा व बारड (जि. नांदेड) कारखान्यातील गनमेटल वस्तू चाेरून त्या मुक्तार मौला पठाण (४२, रा, मुरूड, जि. लातूर) व बार्शी (जि. साेलापूर) येथील भंगारवाल्याला विक्री केल्याचे सांगितले. मुरूडच्या भंगारवाल्याकडून ६ लाख ५७ हजार ४५६ रुपयांचे भंगार जप्त केले.
ही कारवाई स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर, सपोनि. माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, सर्जेराव जगताप, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, तुराब पठाण, गणेश साठे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, युवराज गिरी, अर्जुनसिंग राजपूत, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, महादेव शिंदे, गोविंद भोसले, शैलेश सुळे, हरी पतंगे, व्यंकटेश निटुरे, प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांभळे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.
१० ठाण्यांच्या हद्दीत टाेळीकडून १८ गुन्हे...
भादा, उदगीर ग्रामीण, कासारशिरशी, चाकूर, देवणी, अहमदपूर, उदगीर शहर, निलंगा, किल्लारी व बारड (जि. नांदेड) या दहा ठाण्यांच्या हद्दीत १८ गुन्हे केल्याचे उघड झाले.
‘त्या’ १२ साथीदारांचा पाेलिस पथकाकडून शाेध...
अटकेतील चाेरट्यांनी १२ साथीदारांच्या मदतीने लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत घर, गाेदाम फाेडले. टाेळीतील १२ सराईत गुन्हेगारांचा शाेध पाेलिसांकडून घेतला जात आहे.