इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला मागून दिला धक्का; मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:51 IST2022-11-18T18:47:53+5:302022-11-18T18:51:58+5:30
दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची १० वर्षांपासूनची ओळख आहे.

इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला मागून दिला धक्का; मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबई- कॉल सेंटरमधील नोकरी सुटली म्हणून तणावात असलेल्या प्रेयसीने प्रियकरासोबत दारूचा बेत आखला. दोघेही दारूच्या नशेत मित्राच्या गच्चीवरील १८ फुटांवर असलेल्या टाकीवर चढले. दारूच्या नशेतच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये खटके उडाले आणि त्याने तिला टाकीवरून खाली ढकल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची १० वर्षांपासूनची ओळख आहे. यामध्ये २५ वर्षीय तरुणी जखमी झाली आहे. कॉल सेंटरमधील नोकरी सुटल्यामुळे ती तणावात होती. १३ नोव्हेंबरला तिने प्रियकरासोबत पार्टी केली. तेथून दिंडोशीतील एका मित्राच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर बसले. तेथे नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. याच रागात प्रियकराने तिला खाली ढकलले. १८ फुटांवरून खाली पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पुढील तपासासाठी हा गुन्हा दहिसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या अटकेच्या वृत्ताला दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दुजोरा दिला आहे.