आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:35 IST2024-01-19T15:32:16+5:302024-01-19T15:35:54+5:30
दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं.

आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ
कानपूरमधील हॉस्टेलमध्ये आयआयटीमधील पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियंका जयस्वाल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. मात्र प्रियंकाने हे धक्कादायक पाऊल उचलण्याच्या काही तास आधीच आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी तिने मला उद्या सकाळी फोन करून लवकर झोपेतून उठव, अशी विनंतीही आपल्या आईला केली होती. असं असताना काही तासांत असं नेमकं काय झालं की प्रियंकाला आपला जीव नकोसा झाला, याबाबत गूढ निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून एमटेकचं शिक्षण घेतलं होतं. यामध्ये ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तिला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यानंतर ती जोमाने अभ्यासही करत होती. मात्र आता तिने थेट जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
फोनवर आई-वडिलांशी काय बोलणं झालं होतं?
बुधवारी रात्री प्रियंका अगदी मनमोकळेपणाने आपल्या आई-वडिलांशी बोलली होती. तसंच झोपेतून उठायला उशीर होत असल्याने नाश्ता करायला उशीर होतो, त्यामुळे उद्या सकाळी ७ वाजता मला फोन करून उठव, असंही तिने आपल्या आईला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं. आयआयटी प्रशासनाने चौकशी केली असता त्यांना प्रियंका मृतावस्थेत आढळून आली.
दरम्यान, प्रियंकाने गळफास घेण्यासाठी ऑनलाइन दोन दोऱ्या मागवल्या होत्या, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र तिने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.