क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:35 IST2025-10-29T10:35:12+5:302025-10-29T10:35:43+5:30
पालक घरी परतले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा घरात दिसला नाही. त्यांना वाटले की, सुशांक त्याच्या आजीसोबत झोपला असेल, म्हणून तेही झोपायला गेले. पण..

AI Generated Image
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका निष्पाप मुलाची त्याच्या शेजाऱ्याने निर्घृणपणे गळा दाबून हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह धोबी घाटावर टाकण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने सांगितले की, तो मुलाच्या आईवर रागावला होता, म्हणून त्याने मुलाचे अपहरण केले आणि गळा दाबून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
मुलाची हत्या अनंतपूर जिल्ह्यातील टाउन-३ पोलिस स्टेशन हद्दीतील अरुणोदय कॉलनीमध्ये घडली. ताच भागात पेनय्या आणि सावित्री नावाचे जोडपे आणि हरी आणि नागवेणी नावाचे जोडपे एकमेकांच्या शेजारी राहत होते. पेनय्याची पत्नी सावित्री आणि हरीची पत्नी नागवेणी हे दोघीही चांगलया मैत्रिणी होत्या. पेनय्या हा रिक्षा चालक असून, तो रोज दारू पिऊन घरी येत असे आणि पत्नी सावित्रीला त्रास देत असे. एके दिवशी, सावित्री आणि नागवेणी यांच्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला.
आधी अपहरण आणि नंतर खून
शेजाऱ्याशी झालेल्या वादामुळे पेनय्या आणि सावित्री यांच्यात संतापाची लाट उसळली. दरम्यान, पेनय्या याने हरी आणि नागावेणी यांचा चार वर्षांचा मुलगा सुशांक याचे अपहरण करून खून करण्याचा कट रचला. २५ ऑक्टोबर रोजी सुशांकला घरी ठेवून त्याचे पालक रुग्णालयात गेले होते. ते रात्री उशिरा घरी परतले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा घरात दिसला नाही. त्यांना वाटले की, सुशांक त्याच्या आजीसोबत झोपला असेल, म्हणून तेही झोपायला गेले. तथापि, दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा घरात न दिसल्याने त्याचे पालक घाबरले.
४ वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या
त्यांनी ताबडतोब पोलिसांना मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी अनेक पथके तयार केली आणि सुशांकचा शोध सुरू केला. दरम्यान, त्याच्या पालकांना त्यांचा शेजारी पेनय्या याने त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याचा संशय आला. पोलिसांनी पेनय्या याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सुशांकला घरातून जबरदस्तीने ओढून पळवून नेल्याची आणि नंतर गळा दाबून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
यानंतर त्याचा मृतदेह एका पिशवीत भरून धोबी घाटावर फेकून दिला. पोलिसांनी या चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.