संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 08:56 IST2025-10-25T08:55:51+5:302025-10-25T08:56:37+5:30
पत्नी गोवर्धना हिला आपल्या पतीचे बाहेर कुणासोबत प्रेमसंबंध जुळले आहेत, असा संशय येत होता. आपल्या पतीचे अफेअर सुरू असल्याचा संशय तिच्या मनात बसला होता.

AI Generated Image
एकीकडे संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणांहून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहेत. तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातून एक मनाला हादरवणारी घटना समोर आली आहे. या भागात एका पतीने आपल्या पत्नीला अतिशय क्रूर पद्धतीने संपवलं. केवळ संशयाचं भूत पत्नीच्या मानगुटीवर बसल्याने त्याने रागातून हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती केवळ पत्नीची हत्या करून थांबला नाही, तर रक्तानं माखलेलं हत्यार घेऊन तो थेट पोलीस स्टेशनला पोहोचला आणि तिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
पत्नीचे प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय!
सादर घटना खम्मम जिल्ह्यातील एनकुरू मंडल कॉलनीमधील नाचराम गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. या गावात ताती रामा राव आणि ताती गोवर्धना हे जोडपं राहत होतं. या दोघांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या जोडप्याला तीन मुले देखील आहेत. मात्र, पत्नी गोवर्धना हिला आपल्या पतीचे बाहेर कुणासोबत प्रेमसंबंध जुळले आहेत, असा संशय येत होता. आपल्या पतीचे अफेअर सुरू असल्याचा संशय तिच्या मनात बसला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. मात्र, पती ताती रामा राव याने आपल्या पत्नीला समजावण्याचा खूपदा प्रयत्न केला. काही वेळा त्याने घरातील मोठ्या मंडळींची मदत देखील घेतली.
अनेकदा समजावलं पण...
आपले कुणाशीही प्रेमसंबंध सुरू नाहीत, हे ताती रामा राव याने गोवर्धना समजावले. मात्र, तिच्या मनातील संशय काही केल्या दूर होत नव्हता. यामुळे सतत होणारे वाद आणि चिडचिड घरातील हसते खेळते वातावरण बिघडवून टाकत होते. अनेकदा समजावूनही गोवर्धना समजत नव्हती, यामुळे तिच्या पतीचा संताप अनावर झाला. शुक्रवारी देखील याच मुद्द्यावरून दोघांचा वाद झाला अन् याच भांडणादरम्यान पतीने घरातील कुऱ्हाड उचलून पत्नीवर वार केला. या घटनेत पत्नी गोवर्धनाचा जागीच मृत्यू झाला. घडल्या प्रकारानंतर पती ताती रामा राव रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला.
ताती रामा रावने सांगितलेला घटनाक्रम ऐकताना पोलीसही हैराण झाले. पोलीस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावरून सगळे पुरावे आणि मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.