चालकाला २० फूट फरफटत नेत केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 15:22 IST2023-05-14T15:22:21+5:302023-05-14T15:22:45+5:30
गुरुवारी रात्री आनंदनगर टोलनाक्यावर हा प्रकार घडला.

चालकाला २० फूट फरफटत नेत केली हत्या
मुंबई : कारला धडक दिल्याने नुकसानभरपाईची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला २० फूट फरफटत नेत त्याची हत्या करणाऱ्या ट्रकचालकाला नवघर पोलिसांनी अटक केली. नूर मोहम्मद इब्रार अली शाह (३३) असे त्याचे नाव आहे.
गुरुवारी रात्री आनंदनगर टोलनाक्यावर हा प्रकार घडला. ज्यात भिवंडीला राहणारे मनीष सोनी (३६) हे त्यांचा पुतण्या भावेश सोनी (३१) सोबत काळबादेवीत खरेदी केल्यानंतर ठाण्याच्या दिशेने कारमधून निघाले. आनंदनगर टोलनाक्याजवळ आल्यावर एका ट्रकने त्यांच्या कारला बाजूने धडक दिली आणि पुढे निघून गेला. तो ट्रक टोलनाक्यावर भावेशला रांगेत उभा असल्याचे दिसले, तो त्याच्या कारमधून बाहेर पडला आणि वाहनासमोर उभा राहिला.
तो ट्रकचालकाशी त्याच्या कारचे नुकसान झाल्याबद्दल वाद घालत नुकसानभरपाईची मागणी करत होता. वादाच्यावेळी ट्रकचालकाने इंजिन सुरू केले आणि भावेशला २० फूट खेचत नेले. नवघर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मनीषने जखमी भावेशला रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याला मृत म्हणून जाहीर केले.