टायर पंक्चर करुन दाम्पत्यास लुटले, लुटारूंना आखला असा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:49 IST2022-04-07T16:48:58+5:302022-04-07T16:49:45+5:30
Robbery Case : हिरडी शिवारातील घटना, ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावला

टायर पंक्चर करुन दाम्पत्यास लुटले, लुटारूंना आखला असा कट
समुद्रपूर ( वर्धा) : नागपूर जिल्ह्यातील वणी येथे कारने जात असताना रस्त्यावर काहीतरी टाकून कारचे टायर पंक्चर करुन अज्ञात चार लुटारुंनी चालकाला मारहाण करीत तसेच कारमधील दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याजवळून दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला. ही घटना महामार्ग पोलीस चौकीच्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरडी शिवारात ७ रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
आकिब खान उस्मान खान पठाण रा. वणी हा एम.एच. २९ एडी. ५७०८ क्रमांकाच्या कारमध्ये दाम्पत्याला बसवून वणी येथे गावी जात असताना मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक कारचा समोरील टायर पंक्चर झाला. चालकाने रस्त्याकडेला कार थांबवून कारखाली उतरुन पाहणी करीत असतानाच कारजवळ चार अज्ञात व्यक्ती आल्या आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून रोख १६ हजार ५०० रुपये व त्यांच्या पत्नीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने, कानातील कर्णफुले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला.
यापूर्वी ३ वेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याने याची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी अरविंद येणोरकर व त्यांच्या टीमसह पथक रवाना केले. बोरखेडी टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोध कार्य सुरु केले आहे. पंकज मसराम यांनी श्वान पथक बोलावून ठसे तज्ज्ञांना पाचरण करुन चौकशीला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समुद्रपूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन केले. पुढील तपास प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मेश्राम, सूर्यवंशी, जितेंद्र वैद्य, राजू शेंडे करीत आहे.