संशयाचे भूत एकदा डोक्यात शिरले की माणसाला कशाचेही भान राहत नाही, याचा भीषण प्रत्यय मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर निर्माण झालेल्या आत्मग्लानीतून स्वतःही रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली. हरसूद पोलीस ठाण्यांतर्गत दमदमा गावात घडलेल्या या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
संशयाचे जाळे आणि थरार
४० वर्षीय रामप्रसाद कलम याला आपली पत्नी फूलवती (३६) हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. १५ दिवसांपूर्वी फूलवती घर सोडून निघून गेली होती, जी नुकतीच परतली होती. सोमवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या रामप्रसादने पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून राडा केला. रागाच्या भरात त्याने पलंगाच्या लाकडाने पत्नीच्या डोक्यावर सपासप वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही तो तिला फरफटत जवळच्या नाल्यापाशी घेऊन गेला, जिथे तिचा मृत्यू झाला.
१५ किलोमीटर धावला अन् स्वतःला संपवलं
पत्नीचा डोळ्यांसमोर झालेला मृत्यू पाहून रामप्रसाद भानावर आला. आपण केलेल्या कृत्याचा त्याला इतका पश्चात्ताप झाला की, तो वेड्यासारखा शेतातून पळू लागला. घरापासून तब्बल १५ किलोमीटर दूर बरूड-छनेरा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पोहोचल्यानंतर त्याने भरधाव ट्रेनसमोर उडी घेतली. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक तुटलेला मोबाईल जप्त केला, ज्यावरून मृताची ओळख पटली.
या घटनेत एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी रामप्रसादचे वडील रामकरण हे देखील सध्या तुरुंगात आहेत. तीन वर्षांपूर्वी रामकरणनेही आपल्या पत्नीची अशाच प्रकारे घरात हत्या केली होती. बापाने जे पाप केले होते, त्याच क्रूर मार्गावर मुलगाही चालला आणि एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच हरसूद पोलीस ठाण्याचे टीआय राजकुमार राठोड आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. फूलवतीचा मृतदेह नाल्याशेजारी, तर रामप्रसादचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. त्यांच्या मुलाने, आकाशने वडिलांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Driven by suspicion, a husband in Madhya Pradesh murdered his wife. Overcome with guilt, he then killed himself by jumping in front of a train. The incident has shocked the entire district, revealing a tragic cycle of violence echoing the father's past crime.
Web Summary : मध्य प्रदेश में संदेह के चलते एक पति ने अपनी पत्नी की हत्या कर दी। अपराधबोध से ग्रस्त होकर, उसने ट्रेन के आगे कूदकर आत्महत्या कर ली। इस घटना ने पूरे जिले को झकझोर दिया है, जो पिता के पिछले अपराध की दुखद पुनरावृत्ति है।