आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:43 IST2025-07-21T10:42:54+5:302025-07-21T10:43:17+5:30

अमली पदार्थ विक्रीसह सुमारे ११ गुन्हे दाखल असलेला आरोपी जामिनावर सुटून आल्यानंतर त्याच्या साथीदारांनी मीरा रोडमध्ये फटाके फोडत व आलिशान गाड्यांची रॅली काढत त्याचे जल्लोषात स्वागत केले.

The accused's 'wedding' was the one who took out the procession; Police registered a case! | आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!

आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!

मीरा रोड : अमली पदार्थ विक्रीसह सुमारे ११ गुन्हे दाखल असलेला आरोपी जामिनावर सुटून आल्यानंतर त्याच्या साथीदारांनी मीरा रोडमध्ये फटाके फोडत व आलिशान गाड्यांची रॅली काढत त्याचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या जल्लोष करणाऱ्यांची सार्वजनिक रस्त्यावरून ‘वरात’ काढत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी कामरान मोहम्मद खान हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात होता. ठाणे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर १८ जुलैच्या रात्री उशिरा तो मीरा रोडा येथे आला. यावेळी त्याच्या साथीदारांनी ५ महागड्या वाहनांतून मीरा रोड भागात त्याची मिरवणूक काढली. नया नगर येथील लोधा रोडवरील मुझम्मल शेगडी हॉटेलजवळ त्यांनी फटाके फोडत त्या जल्लोषाची व्हिडीओ क्लिप बनवली आणि समाज माध्यमांवर शेअर केली. ही व्हिडीओ क्लिप पाहून टीकेची झोड उठू लागली. गुंड उघडपणे सार्वजनिक जल्लोष करत असल्याने पोलिसांवरदेखील आरोप होऊ लागले.

अखेर पोलिस आयुक्त निकेत कौशिक आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर जगदाळे, सहायक निरीक्षक सुहेल पठाण व सुधीर थोरात, उपनिरीक्षक समाधान केंगार यांच्या पथकाने सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची वरात काढली.

आणखी ३० ते ३५ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
पोलिसांच्या ताफ्याने या आरोपींची काढलेली मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. फहाद अब्दुल सय्यद, राशीद अस्लम शेख, दिलावर पठाण, समीर युसुफ शेख, फरहान मोहोम्मद खान, अदनान मोहम्मद खान, शरीफ, हैदर काटा, आसिफ यांच्यासह आणखी ३० ते ३५ अनोळखी संशयितांविरुद्ध पोलिसांनी सरकारच्यावतीने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या सर्वांची शोधमोहीम हाती घेतली आहे.

Web Title: The accused's 'wedding' was the one who took out the procession; Police registered a case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.