बांधकाम व्यावसायिकाला गॅंगस्टर रवी पुजारीची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 21:47 IST2019-01-16T21:45:54+5:302019-01-16T21:47:00+5:30
पुजारीच्या खबऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक; दोन कोटींच्या खंडणीची मागणी

बांधकाम व्यावसायिकाला गॅंगस्टर रवी पुजारीची धमकी
मुंबई - गोरेगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावासियाकाला गॅंगस्टर रवी पुजारीने धमकीचा दूरध्वनी करून २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुजारीला या बांधकाम व्यवसायिकाची सर्व माहिती पुरवणाऱ्या विल्यम अल्बर्ट रॉड्रीक्स (21) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानेअटक केली आहे. याप्रकरणी रॉड्रीक्सला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ओशिवरा डेपोसमोर राहणाऱ्या रॉड्रीक्सविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात हाणामारीचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्याचीही प्रक्रिया सुरू होती. खंडणीप्रकरणी रवी पुजारी आणि त्याचा भारतातील प्रमुख हस्तकाविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2018 पासून गॅंगस्टर रवी पुजारी स्वतः दूरध्वनी करून या बांधकाम व्यावसायिकाला धमकावत होता. त्याने २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. बांधकाम व्यावसायिक धमक्यांना घाबरत नसल्यामुळे त्याने त्याचा भाऊ व वहिनीलाही धमकावण्यास सुरूवात केली. बांधकाम व्यावसियाकाचा परदेशात शिकणारा पुतण्या पुन्हा भारतात आल्यानंतर त्यालाही धमकवण्यात आले होते. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाबाबतची माहिती परिसरातील व्यक्ती पुजारी टोळीपर्यंत पोहोचवत असल्याचा दाट संशय निर्माण झाला. त्याबाबत तपास केला असता रॉड्रीक्स ही सर्व माहिती पुरवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खंडणी विरोधीत पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, हवालदार अरुण जाधव यांच्या पथकाने रॉड्रीक्सला अटक केली.