खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 22:56 IST2020-07-08T22:55:45+5:302020-07-08T22:56:41+5:30
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडिल आणि भावाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या
बांदीपोरा : जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून भाजपा नेत्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील भाजपा नेते आणि त्यांच्या दोन कुटुंबातील सदस्यांवर (भाऊ आणि वडील) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अचानक झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाऊदेखील भाजपामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख वसिम बारी असं भाजपा नेत्याचं नाव आहे. वसिम यांच्यावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडिल बशीर अहमद शेख आणि भाऊ उमर सुल्तान यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री 9 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, वसीम यांच्यावर त्यांच्या दुकानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्यांचे वडील आणि भाऊ जखमी झाले, त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.