नवी मुंबईत टोळक्यांची दहशत, मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, मदतीला आलेल्या लोकांवरही हल्ला
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 11, 2023 18:40 IST2023-04-11T18:40:04+5:302023-04-11T18:40:40+5:30
कोपर खैरणेत झोपडपट्टी टोळ्यांची दहशत

नवी मुंबईत टोळक्यांची दहशत, मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, मदतीला आलेल्या लोकांवरही हल्ला
नवी मुंबई : आठ ते दहा जणांनी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्यांवर हल्ला झाल्याची घटना कोपर खैरणेत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सर्वजण परिसरातील झोपड्पट्टीतले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सदर परिसरात या टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे.
कॉर्प खैरणे सेक्टर १९ मधील तलावालगत हा प्रकार घडला आहे. सदर परिसरात सकाळ संध्याकाळ स्थानिक नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. दरम्यान तिथेच काही गुन्हेगारी तरुणांचा वावर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रात्रीच्या वेळी आडोशाच्या ठिकाणी या टोळ्यांकडून नशा करण्यासह लुटमारी केली जाते. अशाच प्रकारातून रविवारी रात्री अज्ञात टोळीने साहिल छारी (१७) याला धरून ठेवले होते. त्याला होत असलेली मारहाण पाहून परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेला तुषार सिंग त्याच्या मदतीला गेला. यामुळे ८ ते १० जणांच्या टोळीने तुषारवर देखील रॉड व लादीच्या तुकड्याने हल्ला केला.
हा प्रकार पाहताच तिथून जाणारे आविश सिंग, अनिकेत सिंग व राहुल सिंग हे त्यांच्या मदतीला आले आले. मात्र टोळीने त्यांच्यावर देखील हल्ला करून जखमी करून पुन्हा भेटल्यावर मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला. यामध्ये जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी घडलेल्या घटनेची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार आठ ते दहा जणांच्या अज्ञात टोळीवर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणारी टोळी परिसरातल्या झोपड्पट्टीतली असल्याचा स्थानिकांचा संशय आहे. यापूर्वी देखील अनेकदा परिसरात गुन्हेगारी कृत्ये झाले असल्याने या टोळीची दहशत पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचा मागणी नागरिक करत आहेत.