श्रद्धाएवढेच भयानक! एअरहॉस्टेसने नकार दिला, तरुणाने फुटक्या बॉटलने तिच्या चेहऱ्यावर वार केले, २५ टाके पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:33 IST2022-11-18T14:30:54+5:302022-11-18T14:33:06+5:30
तरुणाने तो नौदलाचा अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली होती. परंतू तो, आयएनएस अडयार कँटीनमध्ये दिवसाच्या पगारावर काम करणारा कामगार होता.

श्रद्धाएवढेच भयानक! एअरहॉस्टेसने नकार दिला, तरुणाने फुटक्या बॉटलने तिच्या चेहऱ्यावर वार केले, २५ टाके पडले
दिल्लीनंतर चेन्नईमध्ये भयंकर प्रकार घडला आहे. तरुणीने प्रेमसंबंधांसाठी नकार दिला तर तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्य़ाचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी तर दिल्लीत श्रद्धाचे ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता चेन्नईत एअरहॉस्टेससोबत भयानक प्रकार घडला आहे.
एका तरुणाने 20 वर्षीय एस्पॉयरिंग एयरलाइन केबिन क्रू एअरहॉस्टेसला प्रेमासाठी मागणी घातली होती. तिने त्यास नकार दिला होता. या तरुणाने तो नौदलाचा अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली होती. परंतू तो, आयएनएस अडयार कँटीनमध्ये दिवसाच्या पगारावर काम करणारा कामगार होता.
तरुणीने त्याला नकार देताच आरोपी नवीन कुमारने त्याच्या जॅकेटमध्ये लपविलेली रिकामी बिअरची बॉटल बाहेर काढली. ती तोडली आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावर वार केले. यामुळे या तरुणीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून तिच्या चेहऱ्यावर २५ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी सांगितले की, नवीनने तरुणीच्या चेहऱ्यावर मुद्दाम वार केले आहेत. तिला एअरलाईनमध्ये नोकरी मिळू नये व कोणाशी लग्न होऊ नये म्हणून तिचा चेहरा विकृत करायचा होता. तिचे दुसऱीकडे कुठेतरी अफेअर असू शकते, असाही संशय आरोपीला होता. ही तरुणी केरळच्या थिरुवनंतपुरमची होती. सहा महिन्यांपूर्वीच या तरुणाने फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली होती.
मंगळवारी रात्री ही तरुणी हॉटेलवरून तिच्या हॉस्टेलला जात होती. तेव्हा नवीनने तिला रोखले. तिच्याशी लग्न करायचे आहे, असे तो म्हणत होता. तिने नकार देताच त्याने रागात जॅकेटमध्ये लपविलेली बॉटल काढली आणि तिच्या चेहऱ्यावर सलग वार केले. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतू तो पळून जाण्यास यशस्वी ठरला होता, असे पोलिसांनी सांगितले.