मंदिराच्या चौकीदाराला बांधून बंदूक रोखली, तिजोरी फोडून लाखाे लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 07:04 IST2025-01-13T07:03:41+5:302025-01-13T07:04:11+5:30
सशस्त्र ७ जणांचा चंद्रपुरातील तिरुपती बालाजी मंदिरात दरोडा

मंदिराच्या चौकीदाराला बांधून बंदूक रोखली, तिजोरी फोडून लाखाे लंपास
चंद्रपूर : बंदुकधारी सात जणांनी चेहरे झाकून चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास दरोडा घातला. चौकीदाराचे हात-पाय बांधून त्याच्या कानपटीवर बंदूक ठेवून त्याला एका खोलीत बंद केले. दानपेटी फोडून लाखोची रक्कम लंपास केली. याप्रकरणी रविवारी सकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
दाताळा मार्गावर ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. गाभाऱ्यात पाहणी करुन ताे निघून गेला. मध्यरात्री १ वाजता सात सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. चौकीदाराला बंदुकीने धाक दाखवीत दोन्ही हात बांधून खोलीत बंधक बनवून ठेवले.
गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन ते पसार झाले. यावेळी सातही चोरट्यांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे, तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.
सीसीटीव्हीवर कापड
दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश करताच सीसीटीव्हीवर कापड टाकले. त्यामुळे कोणताही चोरटा त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नाही. चौकीदारांकडील तीन हजार रुपये तसेच तो कुणाला संपर्क करू नये, म्हणून मोबाईलही चोरट्यांनी पळविला.